CoronaVirus बिहारी कामगारांसाठी खासदारांना लालू पुत्राचा फोन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 10:50 PM2020-05-04T22:50:38+5:302020-05-04T22:50:56+5:30

सिंधुदुर्गातील कामगारांची स्थिती घेतली जाणून : कामगारांना तेजस्वी यादव स्वखर्चाने बिहारला नेणार

CoronaVirus Tajasvi yadav called Sindhudurg MP for stranded Bihari workers hrb | CoronaVirus बिहारी कामगारांसाठी खासदारांना लालू पुत्राचा फोन 

CoronaVirus बिहारी कामगारांसाठी खासदारांना लालू पुत्राचा फोन 

Next

-  अनंत जाधव 
सावंतवाडी : कोरोना व्हारसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले खरे मात्र यामुळे अनेक मजूर कामगार वेगवेगळ्या राज्यात तसेच जिल्ह्यात, शहरात अडकून पडले आहेत. तसेच बिहारमधील काही कामगार सिंधुदुर्गमध्ये अडकून पडले आहेत. याचा आकडा हा चारशे ते पाचशेच्या घरात आहे. मात्र या कामगारांच्या मदतीसाठी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव धावून आले आहेत. तेजस्वी यांनी खासदार विनायक राऊत यांच्याशी संर्पक करत बिहारमधील कामगारांना आपल्या खर्चाने घेऊन जाणार असल्याचे सांगितल्याने अनेक बिहारी कामगारांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे.


केंद्र व राज्य सरकारने परराज्यातील कामगारांची यादी बनविण्याचे आदेश दिल्यानंतर आता त्यांना आपल्या राज्यात घेऊन जाण्यासाठी तेथील नेत्यांनीही कंबर कसली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक राज्यातील कामगार मजूर देशातील वेगवेगळ्या राज्यात अडकले आहेत. तसे ते महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातही अडकले आहेत. त्यात सिंधुदुर्गमध्ये चारशे ते पाचशे मजूर आहेत. यातील अनेक मजूर हे समुद्रात वाळू काढण्यासाठी किंवा कात भट्टीवर काम करतात तर काही मजूर हे शासकीय ठेकेदारांकडे बिल्डीगचे काम करण्यासाठी अशा वेगवेगळ्या कामासाठी आलेले आहेत. यातील काही मजूर हे सावंतवाडी तालुक्यात आहेत. या मजूरांची निश्चीत अशी संख्या माहिती नसली तरी तो आकडा दोनशेच्या जवळपास जाणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे.
यातील अनेक कामगार हे पहिल्यापासूनच आम्हाला घरी सोडा म्हणून मागे लागले आहेत. काही जण तर चालत जाण्याच्या विचारात होते. पण पोलिसांनी त्यांना परतवून लावले. अशातच आता केंद्र व राज्य सरकारने परराज्यातील मजूरांबाबत सहानुभूतीचा विचार करत या सर्व मजूरांना गावी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रथम एसटीचा पर्याय ठेवण्यात आला होता. यामध्ये मात्र कामगारांची आयुष्यभराची कमाई एका वेळी जाणार अशीच वेळ आली आहे. कामगारांना बिहारला सोडण्यासाठी एसटीचे भाडे तब्बल अडीच लाख रूपये आकारण्यात येणार आहे. तर अनामत रक्कम ही पाच लाख असणार आहे. एसटीच्या या अवास्तव मागणी ऐकून अनेकांचे डोळेच पांढरे झाले आहेत.


मात्र ही स्थानिक पातळीवर कामगारांना सोडण्याची तसेच त्यांच्यासाठी पैशाची जुळवाजुळव सुरू असतानाच शनिवारी रात्री उशिरा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मुलगा माजी उपुख्यमंत्री तेजस्वी यादव याने थेट खासदार विनायक राऊत यांच्याशी संपर्क करत बिहारमधील कामगारांना आम्ही स्वखर्चाने घेऊन जातो असे सांगितले. खासदार यांनी याबाबत पालकमंत्री तसेच अन्य जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले असून, यावर लवकरात लवकर निर्णय घ्या, असे सांगितले आहे.
रविवारी बिहारी कामगारांना बिहारला सोडण्याबाबत तळवडे येथील काहींनी पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी तोडगा काढला जाईल, असे सांगितले होते. त्यामुळे आता कोणत्या स्वरूपाचा तोडगा निघणार हे लवकरच कळणार आहे. पण तेजस्वी यादव यांनी स्वत: पुढाकार घेत कामगारांना घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यामुळे येथील प्रशासन तसेच ठेकेदार यांच्यावरचा ताण थोडासा कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच बिहारच्या कामगारांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.


अन्यथा या कामगारांना घरी जाण्यासाठी कोण पैसे भरणार या विवंचनेत थांबावे लागणार होते. आता थेट बिहारच्या माजी उपमुख्यमंत्र्यानेच या कामगारांची जबाबदारी घेतल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि: श्वास सोडला आहे. मात्र या कामगारांना कसे घेऊन जायचे यावर अद्याप निर्णय झाला नसून, ही प्राथमिक स्तरावरची बोलणी सुरू आहेत. अन्यथा काही कात भट्टी व्यावसायिकांनाही गाडी भाडे व अनामत रक्कमेचा भुर्दंड सहन करावा लागला असता.

Web Title: CoronaVirus Tajasvi yadav called Sindhudurg MP for stranded Bihari workers hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.