CoronaVirus: ...आणि क्वॉरंटाईन सेंटरमध्येच रंगला दशावताराचा खेळ    

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 08:54 PM2020-05-24T20:54:04+5:302020-05-24T20:54:22+5:30

क्वॉरंटाईन सेंटरमध्ये शोधला विरंगुळा; रंगला कोकणी माणूस विरुद्ध कोरोना सामना

CoronaVirus two friends played dashavatar in quarantine centre in sindhudurg kkg | CoronaVirus: ...आणि क्वॉरंटाईन सेंटरमध्येच रंगला दशावताराचा खेळ    

CoronaVirus: ...आणि क्वॉरंटाईन सेंटरमध्येच रंगला दशावताराचा खेळ    

Next

-मनीषा म्हात्रे 

मुंबई : इथे ना स्टेज आहे.. ना कसला महोत्सव.. धडपड फक्त आयुष्य मनसोक्त आनंदात जगण्याची आणि इतरांनाही आनंदात जगायला प्रेरणा देण्याची.. कोरोनामुळे अन्य लोकांप्रमाणे मुंबईतील रोजगार बुडाला म्हणून दोन मित्रांनी गावाकडची वाट धरली. गावी जाण्याचा आनंद तर फार मोठा. मात्र तिथे पोहचताच माळरानावरच्या एका शाळेतील विलगीकरण कक्षात त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले. आणि येथेही जगण्यातला आनंद शोधत एके दिवशी वर्गातल्या कोपऱ्यात ठेवलेल्या छडया तलवारी बनल्या आणि सुरु झाला खेळ दशावताराचा.. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात असलेल्या कांदळगाव नावाच्या एका छोट्याशा खेडे गावात आई सोबत राहणारा सुनील कदम. सुनीलने ३ वर्षापूर्वी नोकारीधंद्यासाठी मुंबई गाठली. सुरुवातीला मुंबईत एका बांधकाम साइटवर काम करत वडाळा येथील भाऊ आणि वहिनीसोबत तो राहू लागला. सुनील मुंबईत रुळला. बघता बघता तीन वर्ष लोटली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सार काही थांबले.

मुंबईत कसाबसा महिना काढला. गावाकडे आईही चिंतेत. अशातच सुनील आणि त्याच्या गावकडच्या शेजारी मित्र सूरज कदम याने गावी जायच ठरवल. ठरल्याप्रामाणे पोलीस आणि वैद्यकीय प्रक्रिया पार पाडून दोघांनी बाईकनेच सुमारे 600 किलोमीटरचा प्रवास करत १४ मे रोजी मालवण गाठले. मालवणच्या वेशीवरच त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले. सर्व वैद्यकीय तापासण्या करून दोघांना घरापासून काही अंतरावर असलेल्या माळरानावरील ओझर या शाळेतील नववी अ च्या वर्गात १४ दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. 

सुनील सांगतो, सुखरूप गावी पोहचल्याच्या आनंदात सुरूवातीचे तीन दिवस भुर्रकन निघून गेले. मात्र पुढे काय? वर्गाच्या चार भिंतीआड़ फक्त दोघेच. सुरूवातीला सगळी शाळा स्वच्छ केली. बाग सजवली. सफासफाईतूनही उरलेल्या वेळेत जुन्या आठवणी आणि गप्पा रंगल्या, बालपणातील पुस्तके पुन्हा उघडली. जोरजोरात वाचन सुरु झाले. शाळेतील आठवणीत दोघही हरवून गेलो. 
 
शाळेची साफसफाई दरम्यान छडी म्हणून वापरण्यात येणारी काठी हातात लागली आणि सहजच तलवारीसारखी फिरवली. तीही जणू तलवारच असल्यासारखी वाटली. सुनीलने कॉलेज जीवनात आणि त्यानंतरही  मालवणमधील कलांकुर ग्रुपसोबत विविध नाटकात काम केले. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई गाठल्याने हे सार काही मागे सुटले होते. मात्र पुन्हा आपल्यातला कलाकार जागवत क्वॉरंटाईनच्या काळातील आयुष्य आनंदात जगण्याची संधी मिळाली.

मग काय.. हातात ती काठी, डोक्याला रुमाल आणि पाठीला टॉवेल गुंडाळून सुरु झाला खेळ दशावताराचा..कोरोना विरुद्ध कोकणी माणूस असे युद्ध रंगले. यातूनच स्वतःची काळजी कशी घ्यायची म्हणत मध्ये मध्ये सॅनिटायझरही वापरत होतो. 

त्यामुळे एकीकडे १४ दिवस क्वॉरंटाईन केल्यानंतर अपुऱ्या सुविधा, मर्यादित वावर, त्यात उन्हाळा अशात चार भिंतीआड जगताना नागरिक कंटाळतात. मात्र अशा परिस्थितीतही जगण्यातला आनंद दाखवून त्याचे व्हडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांनी आतापर्यंत रोज एक असे ८ ते ९ व्हिडीओ तयार  करून सोशल मिडियावर शेअर करत सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहे.

Web Title: CoronaVirus two friends played dashavatar in quarantine centre in sindhudurg kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.