Coronavirus Unlock : कणकवलीतील काही दुकाने सुरू, खरेदीसाठी ग्राहकही उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:37 PM2020-06-27T16:37:49+5:302020-06-27T16:39:12+5:30
कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी गुरुवारी एक, दोन दुकाने वगळता कणकवली बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, ज्यांना दुकाने सुरू ठेवायची आहेत त्यांनी प्रशासनाचे नियम पाळून ती चालू ठेवावीत, असे व्यापारी संघाने जाहीर केल्यानंतर शुक्रवारी बाजारपेठेतील काही दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू झाली होती. त्यामुळे काही ग्राहक बाजारपेठेत खरेदीसाठी दाखल झाले होते.
कणकवली : कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी गुरुवारी एक, दोन दुकाने वगळता कणकवली बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, ज्यांना दुकाने सुरू ठेवायची आहेत त्यांनी प्रशासनाचे नियम पाळून ती चालू ठेवावीत, असे व्यापारी संघाने जाहीर केल्यानंतर बाजारपेठेतील काही दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू झाली होती. त्यामुळे काही ग्राहक बाजारपेठेत खरेदीसाठी दाखल झाले होते.
कणकवली शहर तसेच तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी कणकवली शहरातील स्वयंसेवी संस्था, कणकवली तालुका व्यापारी संघ यांनी स्वयंस्फूर्तीने ३० जूनपर्यंत कणकवली बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे गुरुवारी कणकवली बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, काही व्यापारी तसेच विक्रेते यांनी या बंदला असहमती दर्शविली होती.
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवाच फक्त सुरू होत्या. त्यामुळे कापड दुकानदार, स्टेशनरी, भांडी विक्रेते अशी अनेक दुकाने बंद होती. त्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. ही बाब या व्यापाऱ्यांनी व विक्रेत्यांनी व्यापारी संघाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर गुरुवारी रात्री व्यापारी संघाने दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दुकाने उघडण्याचा निर्णय ऐच्छिक
सोशल डिस्टन्सिंग ठेवून तसेच प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून ग्राहकांना सेवा देण्यास कणकवली तालुका व्यापारी संघाने मुभा दिली आहे. आपली दुकाने उघडायची किंवा नाही हा निर्णय व्यापाऱ्यांसाठी ऐच्छिक ठेवला आहे. त्यामुळे शुक्रवारी कणकवली बाजारपेठेतील अनेक दुकाने उघडण्यात आली होती.