‘नगरसेवका’साठी भाऊगर्दीने रंगत वाढली
By admin | Published: March 27, 2016 01:00 AM2016-03-27T01:00:13+5:302016-03-27T01:00:13+5:30
निवडणुकीत स्थानिकांसह युवावर्गाला प्राधान्य : अपक्ष, बंडखोरांमुळे राजकीय पक्षांची कसोटी, निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्यभराचे लक्ष
रजनीकांत कदम, कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अपक्ष उमेदवारांची झालेल्या भाऊगर्दीचा फटका अनेकांना बसणार तर आहेच पण त्याचबरोबर पक्षांतर्गत बंडखोरीचे संकटही राजकीय पक्षांवर ओढवणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आपलीच सत्ता रहावी यासाठी राजकीय पक्षांची कसोटी नगरपंचायत निवडणुकीत लागली आहे. छाननीनंतर निवडणुकीच्या रिंगणात आता ९१ अर्ज असून माघारीपर्यंत यामध्ये फार मोठा असा फरक पडणार नसल्याचेही उघड आहे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायतीची पहिली निवडणूक इच्छुकांच्या भाऊगर्दीसह अपक्ष व बंडखोर यांच्यामुळे रंगतदार बनली असून जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधणारी ठरली आहे.
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत झालेल्या रूपांतराने प्रशासनाचा कुडाळकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. शिवाय शहराचा विकासही आता नगरप्रशासन खात्याकडून होणार असल्याने नगरपंचायतीचे रूपांतर शहराच्या विकासाला गती आणण्याची शक्यता आहे. साहजीकच गावातून शहराकडे वळलेल्या कुडाळात स्थानिक कार्यकर्त्यांचीही कॉलर ताठ झाली आहे. ग्रामपंचायतीचा कारभार इतिहास जमा होत असताना, नगरपंचायतीच्या इतिहासात नवनगरसेवक पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेकजण सरसावले आहेत. याची परिणीती म्हणूनच निवडणुकीच्या रिंगणात ९१ उमेदवार उभे ठाकले आहेत.
नगरसेवक पदासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची तशी तयारी गेल्या सहा महीन्यापासूनच सुरू होती. राजकीय पक्षांनीही त्यांचा वापर करण्याचा फंडा वापरल्यानेच एका प्रभागात अनेक उमेदवार निर्माण झाल्याचे सत्य कुणालाच नाकारता येणार नाही. त्यामुळे राजकीय पक्षातून इच्छुकांपैकी नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची ही मोठी समस्या बनुन राहीली. त्यामुळे उमेदवारी देताना अनेक ठिकाणी वादावादी पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक प्रभागात बंडखोरीचे संकट राजकीय पक्षांवर ओढवले आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणकीत भाजप व शिवसेना स्वबळाचे अस्त्र वापरून रिंंगणात उतरणार आहेत.
काँग्रेसमध्ये आघाडी, युतीत बिघाडी
अपक्षांसह बंडखोरीची तलवार
छाननी नंतर ९१ अर्ज शिल्लक राहिले आहेत. माघारीची तारीख ४ एप्रिल असून तोपर्यंत राजकीय पक्षांना वाढलेल्या उमेदवारांना आवर घालण्याची कसरत करावी लागणार आहे. पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणारे अनेक उमेदवार असून त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांना देण्यात आलेली आश्वासने यामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे बंडखोरी टाळता येणे अशक्य असल्याचे चित्र आहे.
तर या निवडणुकीत अपक्षांचा झालेला शिरकावही सर्वच पक्षांना मारक ठरणारा असून यामुळे पक्षपदाधिकाऱ्यांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. त्यामुळे बंडखोरी व अपक्षांची टांगती तलवार घेऊनच या निवडणुकीत राजकीय पक्षांना उतरावे लागणार आहे.