नगरसेवक अपात्रता अर्ज फेटाळला

By admin | Published: January 10, 2017 10:33 PM2017-01-10T22:33:27+5:302017-01-10T22:33:27+5:30

कणकवली नगरपंचायत : पारकर गटाला दिलासा; काँग्रेसला धक्का

Corporator disqualification application rejected | नगरसेवक अपात्रता अर्ज फेटाळला

नगरसेवक अपात्रता अर्ज फेटाळला

Next

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, विद्यमान नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्यासह पाच नगरसेवकांच्या विरोधातील अपात्रतेचा अर्ज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी फेटाळला आहे. त्यामुळे नगरपंचायतीतील पारकर गटाच्या नगरसेवकांना दिलासा मिळाला असला, तरी काँग्रेस पक्षाला एकप्रकारे हा धक्काच आहे. नगरसेविका सुविधा साटम यांनी काँग्रेसच्यावतीने हा अपात्रतेविषयीचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता.
कणकवली नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०१३ मध्ये झाली होती. त्यावेळी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसच्या अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांची नगराध्यक्ष म्हणून, तर समीर नलावडे यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या पदांच्या निवडीसाठी २९ सप्टेंबर २०१५ रोजी अधिसूचना जारी केली होती.
यावेळी नगरपंचायतीतील समीर नलावडे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी सुविधा साटम, तर उपनगराध्यक्षपदासाठी गणेश ऊर्फ बंडू हर्णे यांची नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. तसेच काँग्रेसचे हे अधिकृत उमेदवार असल्याचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी जाहीर केले होते. काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना त्यांना मतदान करण्याबाबत व्हीप बजावला होता. तर संदेश पारकर गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी माधुरी गायकवाड व उपनगराध्यक्ष पदासाठी कन्हैया पारकर यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. तसेच आपण गटनेता असल्याचे जाहीर करीत राधाकृष्ण ऊर्फ रूपेश नार्वेकर यांनी या दोघांना संबंधित पदांसाठी उमेदवारी दिल्याचे घोषित केले होते.
त्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या तीन व भाजपच्या एका नगरसेवकाच्या मदतीने माधुरी गायकवाड व कन्हैया पारकर निवडून आले होते.
त्यामुळे अ‍ॅड. प्रज्ञा खोत, रूपेश नार्वेकर, माधुरी गायकवाड, कन्हैया पारकर, सुमेधा अंधारी यांनी पक्षविरोधी कृत्य करीत बंडखोरी केली असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. राष्ट्रीय काँग्रेसचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सुविधा साटम आणि गणेश हर्णे यांच्याविरोधात पक्षादेश डावलून विरोधी मतदान केल्याचे सांगत नगरसेविका सुविधा साटम यांनी पारकर गटाच्या पाच नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी ४ नोव्हेंबर २०१५ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.
त्यामुळे त्या पाच नगरसेवकांना याबाबत खुलासा देण्यासाठी ९ नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढली होती. या अर्जाच्या सुनावणीदरम्यान ७ जून २०१६ रोजी अनिल भंडारी यांची बदली झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी पदावर रुजू झालेल्या उदय चौधरी यांच्यासमोर या अर्जाची सुनावणी झाली. या अर्जाबाबत सव्वा वर्ष सुनावणी सुरू होती. अखेर तक्रारदार व ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तसेच कागदपत्र पाहिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला आहे.
संदेश पारकर गटातर्फे अ‍ॅड. उमेश सावंत यांनी या तक्रार अर्जाबाबत युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)

Web Title: Corporator disqualification application rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.