कालव्याची दुरुस्ती करा अन्यथा ‘कोर्ट मार्शल’
By admin | Published: February 11, 2015 11:06 PM2015-02-11T23:06:32+5:302015-02-12T00:39:27+5:30
संदेश सावंत यांचा इशारा : पाटबंधारे अधिकाऱ्यांची झाडाझडती
कुडाळ : पावशी येथील उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी दोन कोटींचा निधी देऊनही उजव्या कालव्याची दुरुस्ती का झाली नाही, असा प्रश्न पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारत, येत्या ५ मार्चपर्यंत येथील कालव्याची दुरुस्ती करा, नाही तर तुमचे कोर्ट मार्शल करू, असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिला.
पावशी येथील उजवा कालवा नादुरुस्त असल्याने त्या कालव्यातून पाणी येत नव्हते. याबाबत येथील ग्रामस्थांनी तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी राणे यांनी जिल्हा नियोजनमधून उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. पाटबंधारे विभागाने हा निधी गेल्या दोन वर्षात खर्चही केला. मात्र, अद्यापही या कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी पुरवठा होत नाही. पाईप दुरुस्ती झालीच नाही.
रविवारी कुडाळ येथे नारायण राणे काँगे्रेसच्या मेळाव्यासाठी आले असताना पावशी ग्रामस्थांनी त्यांना निवेदन दिले. निधी देऊनही पाणी पोहोचले नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी बुधवारी दुपारी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या. ग्रामस्थांनी, उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये खर्च झाला असतानाही शेतीपर्यंत पाणी पोहोचले नाही. पाईपलाईनसाठी आम्ही मोफत जमिनी दिल्या. आता आमच्याच पैशाने दुरुस्ती करायला येथील अधिकारी सांगत आहेत, असे सांगितले. पाणी नसल्याने आमच्या बागायतीतील झाडे मरून जात आहेत, पाईपलाईन पूर्ण नाही, ती साफ करण्यासाठी चेंबर नाही, अधिकारी सोसायटी स्थापन करायचा सल्ला देत आहेत, अधिकारी आणि ठेकेदारांनी काम व्यवस्थित केलेच नाही, अशा समस्या जिल्हा परिषद अध्यक्ष सावंत व उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्यासमोर मांडल्या. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सदस्य भारती चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, पावशी सरपंच श्रीपाद तवटे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, रुपेश पावसकर, पावशी ग्रामपंचायतीचे सदस्य चिदानंद वाटवे तसेच दादा मयेकर, चंद्रकांत पावसकर, संतोष खोत, आनंद पावसकर, दादा पावसकर, चंद्रकांत वाटवे, बाबू शेलटे, विनायक मयेकर व अन्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सावंत यांनी विचारला अधिकाऱ्यांना जाब
यावेळी संदेश सावंत यांनी याबाबत खुलासा करण्यास सांगताच लघुपाट बंधारे विभागाचे अधिकारी म्हणाले, आम्ही काम केले. परंतु काही पाईपमध्ये झाडाची मूळे वाढत राहतात. त्यामुळे पाणी येत नाही, असा खुलासा केला. परंतु अधिकाऱ्यांना ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देता आली नसल्याने त्यांचे पितळ उघडे पडले. यावेळी सावंंत यांनी अनेक प्रश्न विचारून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दोन कोटी रुपये खर्चूनही पाणी कसे आले नाही, याचा खुलासा द्या. तुमच्या कोटीच्या निधीचे आॅडिट करायला मला लावू नका, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
५ मार्चपर्यंतची डेडलाईन
येत्या ५ मार्चपर्यंत या कालव्याची दुरुस्ती करून पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. अन्यथा स्वत:च्या खिशातील किंवा ठेकेदाराकडून पुन्हा काम करून घ्या, असा सल्ला सावंत यांनी दिला. शेतकऱ्यांच्या हितासाठी नारायण राणे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे हे काम चांगले झालेच पाहिजे. याबाबत आम्ही जनतेबरोबरच राहू, असे संदेश सावंत यांनी सांगितले.