लाचखोर पोलीस अधिकाऱ्याला कोठडी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:23 AM2019-11-22T11:23:55+5:302019-11-22T11:26:19+5:30
मंगळवारी त्याला जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीचा आवाज रेकॉर्ड झालेला आहे. तो पडताळणी करण्यासाठी आवाजाचा नमुना घ्यावयाचा आहे.
सिंधुदुर्गनगरी : मालवण तालुक्यातील बागायत येथील एका व्यावसायिकाकडून सातशे रुपयांची लाच घेताना मसुरे पोलीस उपनिरीक्षक संतोष नांदोसकर याला लाचलुचपत विभागाने मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास रंगेहाथ पकडले होते. त्याला येथील जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात हजर केले असता २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तक्रारदार याच्या व्यवसायाशी संबंधित कायद्याचा धाक दाखवून नांदोसकर याने ही पैशाची मागणी केली होती.
व्यावसायिकाने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास लाचेची रक्कम स्वीकारताना नांदोसकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरा लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नांदोसकर याच्या कट्टा नांदोस येथील घरी जाऊन चौकशी केली.
याबाबतची तक्रार माळगाव बागायतवाडी येथील व्यापारी संजय लक्ष्मण खोत यांनी दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक नितीन कुमार यांनी आपल्या सहकाºयांसह सापळा रचत ही कारवाई केली होती. पोलीस उपनिरीक्षक नांदोसकर याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८चे कलम १० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवारी त्याला जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीचा आवाज रेकॉर्ड झालेला आहे. तो पडताळणी करण्यासाठी आवाजाचा नमुना घ्यावयाचा आहे. तसेच आरोपी पोलीस उपनिरीक्षक आहे. त्यामुळे त्याची जंगम, स्थावर मिळकत तपासायची आहे. त्यामुळे पोलीस कोठडी मागितल्याचे जिल्हा सरकारी अभियोक्ता वकील संदेश तायशेटे यांनी सांगितले.