प्रशासकांच्या आडून राज्यात भ्रष्टाचार, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
By अनंत खं.जाधव | Published: November 23, 2023 05:57 PM2023-11-23T17:57:41+5:302023-11-23T17:58:27+5:30
सावंतवाडी : महाराष्ट्रात सध्या लोकशाहीचा खून सुरू आहे. हे सरकार निवडणूक घेण्यास ही घाबरत आहे. यांना निवडणूका नको मात्र ...
सावंतवाडी : महाराष्ट्रात सध्या लोकशाहीचा खून सुरू आहे. हे सरकार निवडणूक घेण्यास ही घाबरत आहे. यांना निवडणूका नको मात्र सत्ता हवी. महानगरपालिकेत प्रशासकाच्या आडून भ्रष्टाचार सुरू असल्याची गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. ते खळा बैठकीच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असता कोलगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या टिकेला उत्तर देणे टाळत सरकारवर हल्लाबोल केला. लोकशाहीचा खून करून सत्तेवर आलेले सरकार 31 डिसेंबरला जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत राहून निर्णय देणे गरजेचे आहे. हे सरकार लोकशाहीला मानत नसल्यानेच महानगरपालिकेत प्रशासकांच्या आडून याचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही केला. त्यामुळेच येणार्या काळात त्यांना जनता आणि विशेषतः शिवसैनिक नक्कीच त्याची जागा दाखवून देतील, असा विश्वासही व्यक्त केला.
सावंतवाडी विधानसभेच्या जागेबाबत विचारले असता ते म्हणाले, या ठिकाणी सावंतवाडीची जागा आम्ही ताब्यात घेणार आहोत. त्या दृष्टीने आमची मोर्चेंबांधणी सुरू आहे. येथील तीनही विधानसभेसह लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वासही व्यक्त केला.
पत्रकार परिषदेस युवा नेते वरुण सरदेसाई, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, किशोर जैन, संदेश पारकर, शैलेश परब, बाळा गावडे, संजय पडते आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.