कणकवली नगरपंचायतीत सुलभ शौचालयाच्या कामात मोठा भ्रष्टाचार, सुशांत नाईक यांचा आरोप

By सुधीर राणे | Published: May 5, 2023 03:48 PM2023-05-05T15:48:34+5:302023-05-05T15:52:02+5:30

सत्ताधाऱ्यांनी नितेश राणेंना कळू दिलं नाही, नाहीतर..

corruption in work of easy toilets in Kankavali Nagar Panchayat | कणकवली नगरपंचायतीत सुलभ शौचालयाच्या कामात मोठा भ्रष्टाचार, सुशांत नाईक यांचा आरोप

कणकवली नगरपंचायतीत सुलभ शौचालयाच्या कामात मोठा भ्रष्टाचार, सुशांत नाईक यांचा आरोप

googlenewsNext

कणकवली: कणकवली नगरपंचायतमधील सत्ताधाऱ्यानी सुलभ शौचालयाच्या कामात मोठा भ्रष्टाचार केला आहे. सुलभ शौचालयाचे ८६ लाखांचे अंदाजपत्रक केले आहे. त्या बांधकामाचा सरासरी १० हजार ७५० रुपये स्क्वेअर फूट दर होत आहे. घर बांधायला जर दिले तर २ हजार रुपये स्क्वेअर फूट मध्ये काम होत आहे. गेल्या ५ वर्षात कणकवली नगरपंचातीच्या सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला.

कणकवली शासकीय विश्रामगृह येथे आज, शुक्रवारी महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जयेश धुमाळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, निखिल गोवेकर, रुपेश जाधव आदी महाविकास आघाडीतील सदस्य उपस्थित होते.

सुशांत नाईक म्हणाले, कणकवली नगरपंचायत मधील ५ वर्षांचा कार्यकाल सर्वच नगरसेवकांचा पूर्ण झाला आहे. शेवटच्या सभेत आम्ही शहरातील विकासकामांमधील भ्रष्टाचार उघड केला. जुन्या भाजीमार्केट जवळील सुलभ शौचालयाच्या कामासाठी केलेले अंदाजपत्रक बोगस आहे. डीएसार प्रमाणे रेट देण्याची आवश्यकता आहे. मात्र,सत्ताधारी लोकांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे. अन्यथा कणकवलीत १७२ नव्हे तर ३०० कामे मार्गी लागली असती. ही कामे करताना १० लाख रुपये खर्च अपेक्षित असताना २० लाख दराने केली आहेत असा आरोपही नाईक यांनी केला.

सत्ताधाऱ्यांनी नितेश राणेंना कळू दिलं नाही, नाहीतर..

सत्ताधाऱ्यांनी आमदार नितेश राणेंना हा भ्रष्टाचार कळायला दिलाच दिला नाही. नाहीतर देवगड प्रमाणे त्यांनी त्यातील हिस्सा मागितला असता. यापूर्वी नितेश राणे यांनी कणकवली नगरपंचायत मध्ये पारदर्शक कारभार केला असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र,त्यांनी शहरात झालेली कामे आणि त्यांचा खर्च पहावा. म्हणजे त्यांच्या नेमकी स्थिती लक्षात येईल. या शहरातील कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्यामाध्यमातून शासनाकडे करणार आहोत.

नितेश राणेंना ५० कोटी  मिळणार होते

ए.जी.डॉटर्स कंपनीला नगरपंचायतने कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी काम दिले. ते  ५०० कोटींचे कर्ज घेणार होते. त्यात ५० कोटी आमदार नितेश राणे यांना मिळणार होते. मात्र आम्ही आवाज उठल्यामुळे तो प्रकल्प होवू शकला नाही. तो बोगस प्रकल्प आम्ही  होवू दिला नाही. यापुढील काळात महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असेही  सुशांत नाईक यावेळी म्हणाले.

फलक लावा

कन्हैया पारकर म्हणाले, कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून  शहरात गेल्या ५ वर्षात जी कामे झाली आहेत. तिथे कामाचे नाव, ठेकेदार आणि किती रुपयांचे ते काम होते त्याबाबतचा फलक एक महिन्यात लावण्यात यावा अशी मागणी आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे करणार आहोत. फलक न लावल्यास शिवसेना आणि महविकास आघाडीच्यावतीने  सर्व फलक लावण्यात येतील.तसेच वेळप्रसंगी आंदोलनही करण्यात येईल.

प्रदीप मांजरेकर म्हणाले, गेली १५ वर्षे नारायण राणे यांच्या नेतत्वाखाली कणकवली नगरपंचायतीची  सत्ता आहे. मात्र, कोणतीही ठोस कामे शहरात झालेली नाहीत. क्रीडांगण, नाट्यगृह नाही. तसेच कुठला विकासही झालेला नाही.

निलेश गोवेकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी निवडणूक  शिवसेना, काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. नगरपंचायतीत सत्ताधारी लोकांनी गेल्या ५ वर्षात विविध कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्या विरुद्ध आम्ही लढा देणार आहोत.

Web Title: corruption in work of easy toilets in Kankavali Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.