माजगाव नळपाणी योजनेत भ्रष्टाचार, श्रीकृष्ण सावंत आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 08:05 PM2019-06-08T20:05:33+5:302019-06-08T20:08:16+5:30
माजगाव-मळगाव नळपाणी योजनेत दीड कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक वर्षे ही नळपाणी योजना बंद आहे, असा सज्जड दम पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवरही शरसंधान केले.
सावंतवाडी : माजगाव-मळगाव नळपाणी योजनेत दीड कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. अनेक वर्षे ही नळपाणी योजना बंद आहे. या गावांनी पाण्यासाठी कुठे जावे? अधिकारी हे प्रकरण बाहेर काढल्यावर मला घरी भेटायला येतात. पण या पुढे अधिकाऱ्यांनी सभागृहातील विषय सभागृहातच घ्यावा. मला घरी भेटण्यासाठी येऊ नये. आलात तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा सज्जड दम पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवरही शरसंधान केले.
सावंतवाडी पंचायत समितीची बैठक सभापती पंकज पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती संदीप नेमळेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, व्ही. एन. नाईक, सदस्य संदीप गावडे, शीतल राऊळ, मेघ:श्याम काजरेकर, माजी सभापती रवींद्र मडगावकर, मोहन चव्हाण, मनिषा गोवेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी पंचायत समितीची बैठक विविध विषयांवरून चांगलीच गाजली. ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून सदस्यांनी आपली वेगवेगळी मते मांडली. यात नळपाणी योजना राबविण्यात आली, पण ती बंद का? अनेक ठिकाणी इंधन विहिरी देण्यात आल्यात, पण त्यामध्ये पाणी नाही. मग हे प्रकल्प फक्त दिखावा की अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी आहेत. या इंधन विहिरी पुन्हा दुरूस्त करण्यात याव्यात. पण तसे प्रयत्न कुणाकडूनही का होत नाहीत? असा सवाल सदस्यांनी केला.
तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यावर तोडगा काढावा. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. अनेक गावात पाणीटंचाई आली की विहिरी कशासाठी मारल्या जातात, असा सवालही सावंत यांनी यावेळी केला.
अंगणवाडीला मिळणारे धान्य अद्याप माजगाव येथे का पोहोचले नाही? असा सवालही सावंत यांनी केला. यावेळी सभापती पेडणेकर यांनी इतर गावांना हे धान्य पोहोचले असल्याचे स्पष्ट केले. तसेच माजगाव येथे का पोहोचले नाही याची माहिती द्या, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
करिवडे येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी झाली पाहिजे. संबंधित ठेकेदाराला काळ््या यादीत टाका, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली. तसेच पावसाळा आला तरी ग्रामीण भागात अद्याप रस्त्याचे काम कसे होत नाहीत, असा सवाल गोवेकर यांनी केला आहे.
प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा
माजगाव-मळगाव येथील नळपाणी योजना अनेक वर्षे बंद आहे. यावरून जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ही योजना बोगस होती म्हणूनच आमचा गाव पाण्यापासून आजपर्यंत वंचित राहिला आहे. याला जबाबदार कोण? या योजनेच्या विजेचे बिल चार लाख आहे. ते बिल कोणी भरायचे? असा प्रश्न विचारला तर उत्तर मिळत नाही.
तुम्हाला फोन केला तर माहिती मिळत नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलापर्यंत मी जाणार आहे. यात दीड कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर प्रसंगी न्यायालयात जाईन, असा इशाराही यावेळी सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच मी सभागृहात प्रश्न विचारतो. मला घरी भेटण्यासाठी येण्याची हिंमतही करू नका, असेही सावंत यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.