राजापुरात भ्रष्टाचार

By admin | Published: September 13, 2015 10:13 PM2015-09-13T22:13:03+5:302015-09-13T22:13:37+5:30

फर्निचर गैरव्यवहार : नामांकित पतसंस्था चर्चेत

Corruption in Rajapura | राजापुरात भ्रष्टाचार

राजापुरात भ्रष्टाचार

Next


राजापूर : देवरुखपाठोपाठ राजापूर शहरातील एका नामांकित पतसंस्थेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे उघड होऊ लागले आहे. फर्निचरसह अन्य व्यवहारांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून, त्या पतसंस्थेचा कार्यकारी अधिकारी संचालक मंडळाच्या या कारनाम्याचा बळी ठरला असल्याचे बोलले जात आहे. केवळ आपला गोलमाल लपवण्यासाठीच संचालक मंडळाने पतसंस्थेतील अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्याला कामावर हजर करून न घेण्याचा निर्णयही घेतला आहे.
राजापूर शहरात गेली अनेक वर्षे कार्यरत असणारी व तालुक्यातील अनेक ठिकाणी शाखा असणारी एक पतसंस्था प्रगतीकडे वाटचाल करत असतानाच हा फर्निचर घोटाळा उघड झाला. आता त्यातूनच अन्य घोटाळे बाहेर येऊ लागल्याने संचालक मंडळ चांगलेच हवालदिल झाले आहे. सुमारे दहा महिन्यांपूर्वी या पतसंस्थेच्या अन्य दोन शाखांसह राजापूर येथील मुख्य शाखेत फर्निचरचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी या पतसंस्थेचे अध्यक्ष आजारी असल्यामुळे तत्कालीन उपाध्यक्षांच्या अखत्यारीत या कामाची सुरुवात करण्यात आली. तालुक्यातीलच एका फर्निचर वर्कची निवड करुन त्यांच्याकरवी अन्य दोन शाखांमधील फर्निचरचे काम पूर्ण करण्यात आले. कार्यकारी अधिकाऱ्यामुळे या कामात आपल्याला काहीच मिळालेले नसल्यामुळे संचालक मंडळातील काही बड्या धेंडांनी याविरोधात दंड थोपटले. मात्र, ते आता आपल्याच अंगाशी येणार हे समजताच सारवासारव करत हात वर केले आहेत.
या प्रकाराविरोधात आपण बोलल्यामुळे आता आपले अन्य घोटाळे बाहेर पडणार याची जाणीव होताच संबंधित संचालक मंडळातील काही बड्या धेंडांनी या प्रकाराचे खापर कार्यकारी अधिकाऱ्यावर फोडण्यास सुरुवात केली. ज्या उपाध्यक्षांच्या अखत्यारीत हे काम सुरू झाले, त्या उपाध्यक्षांनीही उडी घेतली व संबंधित कार्यकारी अधिकाऱ्याला आपण कामात कसूर केल्यामुळे आपणास सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत असल्याचे पत्र देण्यात धन्यता मानली आहे.
सुमारे दहा - बारा महिन्यांपूर्वी या पतसंस्थेच्या उपाध्यक्षाने संस्थेचे अध्यक्ष रजेवर असताना त्याचा गैरफायदा घेत आपल्या अख्यत्यारीत तालुक्यातील सर्व शाखांमधील फर्निचरचे काम हाती घेतले. मात्र, याबाबत संचालक मंडळाच्या सभेत या कामाला मंजुरी देण्यात आली नाही किंंवा हा विषय संचालक मंडळाच्या सभेतही ठेवण्यात आला नाही. कार्यकारी अधिकाऱ्यांना तसा ठराव मागील सभेच्या एका प्रोसिडिंगमध्ये घ्या, असे आदेश त्या उपाध्यक्षांनी दिले होते. मात्र, संबंधित कार्यकारी अधिकाऱ्यांनी तसे करण्यास नकार दिला. अखेर त्या उपाध्यक्षाने आपल्या अखत्यारीत कामाला सुरुवात केली व त्या-त्या शाखांमधून कामाचे पैसे संबंधित ठेकेदाराला देण्याचे आदेश दिले.
गेल्या दहा - बारा महिन्याच्या कालावधीत या पतसंस्थेच्या ओणी व पाचल येथील दोन शाखांमधील सुमारे २० लाखाचे काम पूर्ण झाले. त्याचे देयकही ठेकेदाराला वर्ग करण्यात आले. राजापूर येथील मुख्य शाखेचेही काम जवळजवळ पूर्णत्त्वास आले असून, त्या कामाचेही ७० टक्के देयक अदा करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)


कार्यकारी अधिकाऱ्याचा बळी ?
या संपूर्ण व्यवहारात आपला काहीच फायदा न झाल्याचे निदर्शनास येताच संचालक मंडळातील काही बड्या राजकीय धेंडांना हाताशी धरुन आता या संपूर्ण प्रकाराला कार्यकारी अधिकाऱ्यालाच जबाबदार धरण्यात येत आहे. मात्र, संबधित कार्यकारी अधिकाऱ्याचा कोणताही खुलासा न मागवता संचालक मंडळाने केवळ चौकशीच्या नावावर संबधित कार्यकारी अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. फर्निचर घोटाळ्यामुळे या नामांकित पतसंस्थेतील अन्य घोटाळेही आता पुढे येऊ लागले आहेत. सभासदांच्या पैशावर जीवाची मुंबई सुरु असल्याचे खुलेआम बोलले जात आहे. या प्रकारामुळे संचालक मंडळाच्या विरोधात सभासदांमधून तीव्र्र संताप व्यक्त करण्यात येत असून, या संपूर्ण प्रकाराची उघडपणे चौकशी करण्याची मागणी सभासद करत आहेत.

पैसेवाटप होताना ‘ते’ काय करत होते?
अन्य दोन शाखांसह मुख्य शाखेच्या फर्निचरचे सुमारे ३० लाख रुपयांचे काम लगतच्या लांजा तालुक्यातील एका ठेकेदाराला देण्यात आले. या ठेकेदाराने आपले काम सुरु करुन पूर्णत्त्वास आणले आहे. आजपर्यंत या कामाचे सुमारे ९० टक्के देयक ठेकेदाराला अदा करण्यात आले असून, एवढे पैसे दिले जात असताना व काम सुरु असताना ही बाब संचालक मंडळाच्या कशी काय लक्षात आली नाही, असा प्रश्न केला जात आहे. केवळ आपला फायदा न झाल्यानेच आता संचालक मंडळातील काहींनी याबाबत उचल खाल्ली असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Corruption in Rajapura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.