पुरळ नळपाणी योजनेत भ्रष्टाचार
By admin | Published: January 1, 2016 11:21 PM2016-01-01T23:21:51+5:302016-01-02T08:29:27+5:30
संतोष किंजवडेकर : देवगड पंचायत समिती सभेत चौकशीची मागणी
देवगड : पुरळ ग्रामपंचायतमधील चार नळपाणी योेजनांमध्ये निकृष्ठ दर्जाचे काम होऊन या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असून याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देवगड पंचायत समितीच्या सभेमध्ये पंचायत समिती सदस्य संतोष किंजवडेकर यांनी केली.
पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात सभापती डॉ. मनोज सारंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती स्मिता राणे, सहाय्यक गटविकास अधिकारी शेखर जाधव व पंचायत समिती सदस्य तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
पुरळ ग्रामपंचायतमध्ये पुरळ कलंबई, पुरळ, पुरळ कोठारवाडी व पुरळ हुर्शी अशा चार नळपाणी योजना असून या योजनाही राष्ट्रीय पेयजल योजनेमधून झाल्या आहेत. या योजनेमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. पुरळ गावचे सरपंच व ग्रामीण पाणीपुरवठा अध्यक्ष यांचा या कामावर अंकुश नसल्यानेच या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किंंजवडेकर यांनी केला आहे. १ डिसेंबरपासून गुढरित्या गायब झालेल्या देवगड तालुक्यातील साळशी व चाफेड गावचे ग्रामसेवक सुनिल ठोबा पावरा (वय ३२) यांचा मृतदेह मालवण तालुक्यातील रेवंडी मधलीवाडी येथील जंगलमय भागात गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यांचे वडील ठोबा पावरा यांनी आपल्या मुलाला देवगड पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची बातमी वृत्तपत्राद्वारे प्रसिद्ध केली होती. या बातमीची सखोल चौकशी करावी तसेच पंचायत समितीमध्ये असा मानसिक त्रास दिला जात असेल तर सामान्य कर्मचाऱ्यांना आपली सेवा बजावणे कठीन जाईल असा आरोप रवींद्र जोगल यांनी केला.
सौंदाळे गावातील ज्या ग्राहकांना नळ मिटर बसवून जी कनेक्शने देण्यात आली आहेत. त्या गोष्टीची चौकशी करण्याची मागणी प्रकाश गुरव यांनी केली. विजयदुर्ग प्रादेशिक नळ योजनेवरील ग्राहकांना १२ महिन्यापैकी एप्रिल, मे या दोन महिन्यात पाणीटंचाई भासते. मात्र, बाराही महिन्याच्या बिलाची आकारणी केली जाते. यावर योग्य तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मत सरवणकर यांनी व्यक्त केले.
तसेच ज्या ग्रामपंचायतीने नळ ग्राहकांना मिटर बसविण्यास दुर्लक्ष केले आहे. अशा ग्रामपंचायतीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सरवणकर यांनी सांगितले. शिक्षक आपल्या मुख्यालयी राहत नाहीत याच्या वारंवार तक्रारी येत असल्यामुळे सरपंचाचा दाखला असणे आवश्यक असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितल्यावर सरपंचांचा दाखला आवश्यक नसून यासाठी शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक यांचाही दाखला असणे आवश्यक असल्याचे जोगल यांनी सांगितले. देवगड तारामुंबरी पुलाचे अंतर्गत रस्त्याचे काम सुरू झाले असून येत्या सात ते आठ दिवसात पुलाच्या कामाला सुरूवात होईल व पावसाळ्यापूर्वी देवगड तारामुंबरी पुलाचे काम पूर्ण होईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शिवाजी पोवार यांनी सभागृहाला सांगितले.
तसेच देवगड ते तळेबाजार येथील ६९ विद्यार्थ्यांना गेली वर्षभर मागणी करून देखील एसटी फेरी सुरू करण्यात आली नाही. येत्या १५ दिवसांत ही फेरी सुरू न केल्यास विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिप्ती घाडी यांनी एस.टी.प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिला. तसेच देवगड आगारातील चालक व वाहक यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्याची गरज असल्याचे मत संजिवनी बांबुळकर यांनी केले.
तसेच देवगड पवन ऊर्जा प्रकल्पाचे सुमतीनगर येथील ५० मीटरचे काम थांबले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून ते काम तत्काळ सुरू करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य संतोष किंजवडेकर यांनी केली. (प्रतिनिधी)
रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची : वसंत सरवणकर यांचा आरोप
गेल्या दीड वर्षात रस्त्यांची कामे झाली आहेत, त्यांची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचे सा.बां.विभाग व जिल्हा परिषद विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, गेल्या दीड वर्षात एकाही पत्राचे उत्तर मिळाले नसल्याची खंत वसंत सरवणकर यांनी व्यक्त केली. तसेच बी.एस.एन.एल विभागामार्फत केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या बाजूने जी खोदाई केली आहे. तो रस्ता सुस्थितीत आणून देण्याची जबाबदारी बी.एस.एन.एल विभागाची असल्याचे जोगल यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामीण रूग्णालयामध्ये कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्यामुळे दुपारनंतर रूग्णांना बाहेर जाऊन एक्सरे काढावा लागत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे किंजवडेकर यांनी सांगितले.
ग्रामस्थांना बिले वेळेत देण्याची मागणी
पंचायत समितीच्या फंडातून सुचविलेले विकास कामे ग्रामपंचायतीला रद्द करण्याचे अधिकार आहेत का असा सवाल प्रकाश गुरव यांनी उपस्थित केला. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून जी कामे करण्यात आली आहेत त्या ग्रामस्थांना बिले वेळेत अदा केली जात नसल्याचा आरोप सरवणकर यांनी केला.