वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 07:31 PM2021-08-04T19:31:54+5:302021-08-04T19:36:05+5:30
Politics VaibhavNaik Sindhudurg : वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना तत्काळ संबधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
कणकवली: सिंधुदुर्गजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून शाळांना पुरविलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना तत्काळ संबधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
सिंधुदुर्गजिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून शाळांना पुरविलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हापरिषद सदस्य नागेंद्र परब यांनी पुराव्यांसहीत आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचे सिद्ध केले. जिल्हा परिषद शाळांना जे वॉटर फिल्टर-कुलर पुरविण्यात आले त्यांची बाजारामध्ये १५ हजार रुपये किंमत असताना प्रत्यक्षात मात्र, २० हजार रुपयांपर्यंत ते खरेदी केल्याची बाब कागद पत्रांसाहित नागेंद्र परब यांनी उघड केली आहे.
काही शाळांना कोरी बिले देखील देण्यात आली आहेत. यामुळे १००५ शाळांना वॉटर फिल्टर-कुलर पुरविताना किमान ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केला गेला असल्याचे निष्पन्न होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून केलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये झालेल्या ५० लाख रुपयांच्या आर्थिक भ्रष्टाचाराची आपल्या स्तरावर चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच यामधील दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश कोकण विभाग आयुक्त यांना देण्यात यावेत अशी मागणी आपण पत्राद्वारे हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे, असेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.