महामार्गाच्या जमिनीचा मोबदला पाचपट
By admin | Published: January 27, 2016 11:51 PM2016-01-27T23:51:46+5:302016-01-28T00:12:53+5:30
चौपदरीकरण भूमिपूजन : गडकरी, फडणवीस उद्या रत्नागिरीत
रत्नागिरी : चौपदरीकरणामुळे होणाऱ्या विस्थापितांना रेडीरेकनरच्या दरापेक्षा ५ पट जमिनीचा मोबदला दिला जाणार आहे. वारस तपास केल्यानंतर प्रशासनाकडून जून - जुलैमध्ये हा मोबदला दिला जाईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन २९ रोजी केले जाणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सचिन वहाळकर, दत्तात्रय देसाई, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर, पंचायत समितीचे उपसभापती योगेश पाटील, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी व अन्य उपस्थित होते. माने पुढे म्हणाले, मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ९0 टक्के भूसंपादन झाले आहे़ या पार्श्वभूमीवर चौपदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे़ २९ जानेवारीला सकाळी १० वाजता निवळी येथे पेट्रोलपंपासमोर केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चौपदरीकणाचा कोनशिला समारंभ होणार आहे. ६ टप्प्यांच्या उर्वरित कामाच्या निविदा फेब्रुवारीमध्ये निघणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
भूसंपादनाबाबत माने म्हणाले, ही किचकट प्रक्रिया १८ ते २० महिने सुरू आहे. सेक्शन ३ (अ)नुसार हरकती दावे व नोंदवले असून ३ (ब)नुसार राजपत्रात नोंद करून सरकारकडे जमिनींचा ताबा मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. रायगड जिल्ह्यात काम प्रलंबित असल्याने ठेकेदारांना विश्वासात घेऊन काम सुरू झाले आहे. गेल्या दहा वर्षांत अपूर्ण राहिलेले काम आता पुढील दोन-तीन वर्षांत पूर्ण होईल, त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवळीमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता पुण्याकडे रवाना होणार आहेत.
सकाळी ९.३० वाजता मार्गताम्हाने येथील कार्यक्रम आटोपून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी निवळी येथे पोहोचतील. त्यानंतर मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत रत्नागिरी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नव्या जिंंदल इमारतीचे आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयातील सावरकर संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. (शहर वार्ताहर)
बाळ माने : महामार्ग होणार काँक्रीटचा...!
२६ मे २०१४ रोजी केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर गडकरी यांना रस्ते वाहतूक मंत्रीपद मिळाले. त्यामुळे कोकणच्या विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या. इंदापूर ते झाराप हा ३६६ किलोमीटर्सचा महामार्ग सिमेंट काँक्रिटचा करण्यास गडकरी यांनी मंजुरी देऊन ६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी सांगितले.
चौपदरीकरणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अनंत गीते, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार विनायक राऊत यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत.
मंत्र्यांचीही मांदियाळी२९ ते ३१ जानेवारी या तीन दिवसांत पाच मंत्री रत्नागिरीत येणार आहेत़. ३० तारखेला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सरकारी योजनांचा आढावा घेणार आहेत. २९ला सिंधुदुर्ग व ३० रोजी रत्नागिरीचा आढावा घेतील. ३१ला स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या समारोपाला केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत.