‘एलईडी’प्रश्नी प्रशासनावर नगरसेवकांची नाराजी
By admin | Published: March 18, 2017 10:43 PM2017-03-18T22:43:52+5:302017-03-18T22:43:52+5:30
नगराध्यक्षांचे आदेश : बंद दिवे बदलून घ्या
मालवण : शहरात एलईडीचा प्रश्न चर्चेत असताना अखेर अपेक्षेप्रमाणे पालिका सभागृहात अनपेक्षित एलईडीचा विषय चांगलाच गाजला. शहरात बसविण्यात येत असलेले एलईडी दिवे निकृष्ट दर्जाचे असल्याचा सनसनाटी आरोप गटनेते गणेश कुशे यांनी करत एलईडीवर वादळी चर्चा करण्यास रान मोकळे करून दिले. त्यानंतर सर्व नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, संबंधित ठेकेदाराला नगरसेविका पूजा करलकर यांच्या मागणीनुसार सभागृहात पाचारण करून माहिती घेण्यात आली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही प्रशासनाला ठेकेदारांकडून बंद पडलेल्या दिव्यांची पहिली दुरुस्ती करून घ्या. त्यानंतर नवे दिवे बसविण्याची कार्यवाही करा असे आदेश दिले.
मालवण पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, पंकज साधये, नितीन वाळके, आप्पा लुडबे, गणेश कुशे, यतीन खोत, मंदार केणी, शीला गिरकर, दर्शना कासवकर, ममता वराडकर, सुनिता जाधव, आकांक्षा शिरपुटे, पूजा करलकर, पूजा सरकारे, सेजल परब आदी उपस्थित होते.
एलईडी दिवे बसविण्यापूर्वी आक्षेप घेणे चुकीचे आहे. वादळी चर्चा करण्यापेक्षा पालिकेने एलईडी बसविण्याची कार्यवाही पूर्ण करावी, अशी मागणी मंदार केणी यांनी केली. शहरातील एलईडीची कार्यवाही योग्य रीतीने सुरु आहे. ‘इलेक्ट्रिक पार्ट नो गॅरंटी’ असे सांगत काही दिवे तांत्रिक कारणामुळे बंद आहेत. मात्र ठेकेदारांकडून बदलून देण्याचे काम सुरु आहे. प्रशासकीय धोरणाला विरोध करणे आक्षेपार्ह आहे. एलईडीचे स्वागत जनता करत असताना त्याला कोणी विरोध करून नये, असे सुदेश आचरेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यात खडाजंगी
एलईडीचा विषय नगरसेवकांनी चांगलाच तापविला असताना उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि नगराध्यक्ष कांदळगावकर यांच्यात खडाजंगी पहायला मिळाली. नगराध्यक्षांच्या नावाने काही नगरसेवकांनी एलईडी बसविण्याचे तर काहींनी बसविण्यात येवू नये, अशी पत्रे दिली असताना नगराध्यक्ष प्रशासनावर ढकलत आहे, असे वराडकर यांनी सांगताना मुख्याधिकारी व आपल्यात समन्वय असून एलईडी बसविण्याची कार्यवाही असल्याचे स्पष्ट केले.
नगरसेवक प्रशासनाचे नोकर नाहीत
एलईडी विषयवार प्रशासनाचा अंकुश नसल्याचे करलकर यांनी सांगितले. नगरसेवक म्हणजे प्रशासनाचे नोकर नाहीत. एलईडीचे प्रशासनाकडून नियोजन झाले नसल्याने नगरसेवक बदनाम होत असल्याचे आप्पा लुडबे यांनी सांगितले. तर बंद एलईडी दिव्यांवर कार्यवाही झाल्यानंतर ठेकेदाराने बंद एलईडीचे कारण पालिकेला देण्याची सूचना केली. नगरसेवक यतीन खोत यांनी बंद दिवे बदलण्याची कार्यवाही न झाल्यास मेणबत्ती आंदोलन छेडणार असल्याचे स्पष्ट केले.