मालवणातील नौदल दिनाच्या कार्यक्रमाचे काऊंट डाऊन सुरू, व्हाईस अॅडमिरल संजय भल्ला यांनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:17 PM2023-10-13T13:17:47+5:302023-10-13T13:18:01+5:30
मुख्य शामियाना, पुतळ्याची जागा, निवास व्यवस्था आदींची केली पाहणी
मालवण: मालवण येथे होणाऱ्या भारतीय नौदल दिनाच्या कार्यक्रमाचे काऊंट डाऊन सुरू झाले असून वेस्टर्न नेव्हल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाईस अॅडमिरल संजय भल्ला यांनी मालवणला भेट देत कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या सोबत इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे अधिकारीही उपस्थित होते.
तारकर्ली एमटीडीसी समोरील किनाऱ्यावर नौदलाचा मुख्य कार्यक्रम होणार असून याठिकाणी भव्य शामियाना उभारण्यात येणार आहे. याच शामियान्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील उच्च पदस्थ अधिकारी, मंत्रीगण उपस्थित असणार आहेत. सायंकाळी ५:३० वाजता मोदींची शामियान्यात एन्ट्री झाल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी राजकोट येथील शिवछत्रपींच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. एमटीडीसी किनाऱ्यावर शामियान्याच्या कामाला सुरुवात तारकर्ली एमटीडीसी समोरील समुद्रात भारतीय नौदलाकडून कसरती आणि कवायती सादर केल्या जाणार आहेत. याच ठिकाणी नौदलाच्या ड्रील पथकाचे चित्तथरारक सादरीकरण, विविध प्रकारच्या कसरती, मार्कोस कमांडोंचे बचावकार्य, समुद्री बचाव मोहिमा यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे.
संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असलेला हा क्षण पाहण्यासाठी आणि नौदलाची मानवंदना स्वीकारण्यासाठी येथे उभारण्यात येणाऱ्या शामियाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल, देशातील उच्च पदस्थ अधिकारी आणि मंत्रीगण उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवण येथील कार्यक्रमासाठी दुपारी नौदलाच्या हेलिकॉप्टर मधून बोर्डिंग ग्राऊंडवर उतरणार आहेत. तेथून ते राजकोट येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी राजकोट येथे जाणार आहेत. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर तारकर्ली येथे नौदलाच्या सायंकाळी ५:३० वाजता होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणीं थांबणार आहेत त्या ठिकाणांची संजय भल्ला यांनी पाहणी केली.
संजय भल्ला यांनी रविवारी राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या शिव छत्रपतींचा पुतळ्याच्या कामाचा आढावा घेतला. यानंतर तारकर्ली येथे झालेल्या आढावा बैठकीत एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कोकण विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर, ऐश्वर्या काळुसे, चिपी विमानतळाचे संचालक किरण कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, तहसीलदार वर्षा झाल्टये आदी उपस्थित होते.