सावंतवाडीत काँग्रेसला न्यायालयाचा दिलासा
By admin | Published: December 9, 2015 01:08 AM2015-12-09T01:08:41+5:302015-12-09T01:11:30+5:30
पंचायत समिती : चार सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती
सावंतवाडी : काँग्रेसच्या चार सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी वेगळा गट स्थापन केल्याच्या कारणावरून अपात्र ठरवल्याने सावंतवाडी पंचायत समितीत कॉंग्रेसची सत्ता धोक्यात येणार, असे वाटत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने काँॅग्रेसला थोडा दिलासा मिळाला आहे. पंचायत समितीत कॉंग्रेसचे पूर्ण बहुमत झाले आहे. या निर्णयानंतर पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत यांनी शिवसेनेचे भगवा फडकवण्याचे स्वप्न विरले असल्याची प्रतिक्रिया दिली.
सावंतवाडी पंचायत समितीत काँग्रेसची पूर्ण सत्ता होती. काँग्रेसचे ८, राष्ट्रवादीचे ७, शिवसेना १, भाजप १ असे १७ सदस्य होते. त्यात काँग्रेसने शिवसेना १ व भाजपचा १ घेऊन विकास आघाडीची स्थापना केली. आतापर्यंत या विकास आघाडी म्हणजे काँग्रेसचीच पंचायत समितीत सत्ता आहे. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या चार सदस्यांनी वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये उपसभापती महेश सारंग, सदस्य नारायण राणे, सुनयना कासकर, विनायक दळवी, आदींचा समावेश होता. या गटाला शिवशाही गट असे नाव देत शिवसेनेला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. मात्र, काँग्रेसने सुरुवातीला सत्तास्थापनेवेळी विकास गट स्थापन केला होता. तो गट जिल्हाधिकारी दप्तरी हयात असतानाच दुसरा गट स्थापन करण्यात आला होता, पण या चार सदस्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय मागे घेत पुन्हा काँग्रेसच्या झेंड्याखाली काम करण्याचे ठरवले. विकास गट तसेच शिवशाही गट जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर रद्द करून घेत काँग्रेसचा एकमेव गट स्थापन करण्यात आला. मात्र, हा नवीन गट स्थापन करीत असताना जुना गट रद्द करण्यात आला नाही. हे कारण देत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी या चारही सदस्यांना अपात्र घोषित केले होते. या अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे पंचायत समितीमधील काँग्रेसची सत्ता धोक्यात आली होती.
या चारही सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्या व मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रद्दबातल ठरवत अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती दिली असून, उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी यांनी आपल्या निर्णयाची फेरतपासणी करावी, असे सांगितले आहे. त्यामुळे चारही सदस्यांची सुनावणी पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे होणार आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे संख्याबळ पूर्वीएवढेच राहिले असून, पंचायत समितीवर शिवसेना अविश्वास ठराव आणणार होती, तो आता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मागे घ्यावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
भगवा फडकवण्याचे मनसुबे उधळले : सावंत
उच्च न्यायालयाच्या निकालावर बोलताना सभापती प्रमोद सावंत म्हणाले, शिवसेना पंचायत समितीवर भगवा फडकवणार होती, पण त्यांचे मनसुबे उधळले गेले आहेत. आतापर्यंत अनेकवेळा शिवसेनेने वल्गना केल्या होत्या, पण त्या नियतीने त्यांना पूर्ण करू दिल्या नाहीत. चार सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती मिळाल्याने आम्ही पूर्वीसारखेच चांगले काम करून जनतेचे प्रश्न सोडवू, असे मत सावंत यांनी व्यक्त केले आहे.