घरासमोरील ‘अंगण’ झाले चिरेबंदी

By admin | Published: April 1, 2016 10:22 PM2016-04-01T22:22:56+5:302016-04-02T00:18:57+5:30

पारंपरिकता होतेय लुप्त : झावळी, मांडव होत आहेत गायब; खेळणेही बंद

The 'courtyard' behind the house became closed | घरासमोरील ‘अंगण’ झाले चिरेबंदी

घरासमोरील ‘अंगण’ झाले चिरेबंदी

Next

निकेत पावसकर -- नांदगाव --मोठमोठ्या शहरांमुळे ग्रामीण भागाचेही झपाट्याने आधुनिकीकरण होत असले तरीदेखील कौलारू घरासमोरील सारवण केलेले अंगण आणि त्यावर असलेला मांडव (मंडप) ही कोकणातील संस्कृती काही ठिकाणी जपलेली दिसून येते. अलीकडे अत्यंत वेगाने होत असलेल्या बदलामुळे अनेक रूढी-परंपरा मागे पडत आहेत. त्यातीलच एक म्हणजे कोकणातील कौलारू घरासमोरील सारवण केलेले अंगण आणि त्यावर असलेला मांडव म्हणजे स्वर्गसुख अलीकडे दुर्मीळ झालेला दिसतो. अनेकांच्या घरासमोरील अंगण हे चिरेबंदी बांधलेले असल्याने त्यातील मजा आणि पारंपरिकता लुप्त होत चालली आहे.
कोकणातील अनेक रूढी-परंपरा या जिवापाड जपल्या जातात. वयोवृद्ध माणसे पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपत असतात. जसजशी प्रगती होत चालली, तसतशी कोकणातील घरे बदलली. विशेषत: कौलारू घरासमोरील असलेले अंगण आणि मांडव यात बदल झालेला दिसून येतो. अलीकडील काही वर्षांपर्यंत अनेक घरांसमोर सारवण केलेले अंगण आणि त्यावर मांडव घातलेला दिसून यायचा. मात्र, त्यात सध्या बदल होऊन सारवण केलेल्या अंगणाची जागा चिरेबंदी बांधलेल्या अंगणाने घेतली.
पारंपरिक अंगणावर सावलीसाठी माडाच्या झावळी किंवा गवताचा वापर केला जायचा. अंगण गावातील काही खास माणसांकडून करून घेतले जायचे. अंगण झाले की त्यावर घरातील महिला सारवण करून घ्यायचे. त्यावर चारही बाजूला मेडके उभे करून बांबूचे वासे टाकून वरती सावळी केली जायची. काही वर्षांपूर्वी सावलीसाठी वापरण्यात येणाऱ्या झावळी किंवा गवताची जागा सध्या कापड व पत्र्यांनी घेतलेली दिसते. अलीकडे मांडवदेखील कायमस्वरूपी बांधकाम करून उभारून त्यावर सिमेंट किंवा आधुनिक पत्रे टाकून उभारला जात असल्याचे सर्रास दिसून येते. गावतील कौलारू घरांच्या सौंदर्यात अधिक भर पडायची ती उन्हाळ्यात गवताच्या मंडपाने अनेकजण याच थंडगार मंडपात दुपारची झोप घ्यायचे. सायंकाळी याच मंडपाच्या मेडींना पकडून खेळायचे; पण आज मंडपही लोखंडी व पत्र्याच्या छप्पराचे झाले. दुपारची झोप गायब झाली आणि सायंकाळचे खेळणेही बंद पडले. जमिनीचे सारवण करून व सावलीसाठी टाकलेल्या गवत असलेल्या अंगणातील मजा अलीकडेच्या अंगणात मिळत नाही. थंडीच्या दिवसांत स्वच्छ चांदण्यामध्ये गप्पा मारत बसण्याचा अल्हाददायक क्षण मात्र हिरावून घेतल्यासारखे झाले आहे. थंडीच्या दिवसात स्वच्छ चांदण्यामध्ये गप्पा मारत बसण्याची मजा आणि आनंद काही औरच असतो. थंडी संपल्यानंतर ज्यावेळी कडक उन्हाळा सुरू होतो, तेव्हा अंगणात झोपण्याची मजाही अनुभवता येते.
या मांडवात घरच्या महिलांनी काढलेली अत्यंत सुंदर रांगोळीही अनेकांचे लक्ष वेधून घेते. पूर्वापार चालत आलेली ही अंगण
आणि मांडवाची संस्कृती आजही कोकणात काही ठिकाणी पाहावयास मिळते.


‘ते’ प्रसंग आणि अनुभव
अनेक प्रकारचे धार्मिक प्रसंग विशेषत: कोकणातील विवाह सोहळे याच मांडवामध्ये करण्याची प्रथा आजही सुरू आहे. एखादा विवाह सोहळा अशा अंगणात स्वत:च्या घरी होणे हा अनेकांसाठी अलौकीक आनंद असतो. शिवाय लहान मुलांना विविध खेळ खेळायला हे अंगण म्हणजे प्रशस्त जागा असून, तो अनुभवही त्यांच्यासाठी विशेष असतो. वयोवृद्ध माणसांकडून अशा मांडवांमध्ये अनेक प्रकारच्या गप्पा मारतानाचे अनेक प्रसंग आम्ही लहान असताना अनुभवले आहेत. भविष्यात पुढील पिढीला मात्र कोकणातील कौलारू घरासमोरील सारवण केलेले अत्यंत स्वच्छ अंगण आणि मांडव पाहताही येणार नाही आणि ती मजाही अनुभवता येणार नाही.

Web Title: The 'courtyard' behind the house became closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.