चुलत भावाचा वार करून खून
By admin | Published: September 22, 2015 09:52 PM2015-09-22T21:52:00+5:302015-09-22T23:26:03+5:30
राजापुरातील सौंदळ येथील घटना : ‘इंदिरा आवास’ने गळा घोटला
राजापूर : शासनाच्यावतीने मिळालेल्या इंदिरा आवास योजनेतील घरावरून खदखदत असलेल्या संतापाचे रूपांतर खुनात झाल्याची घटना तालुक्यातील सौंदळमधील भालेकरवाडीत सोमवारी सायंकाळी ५ वाजता घडली. यामध्ये चंद्रकांत बापू चव्हाण (वय ७२) ठार झाले असून, त्यांच्या खुनाला जबाबदार असणारा संशयित आरोपी व मृताचा चुलतभाऊ दत्ताराम गोपाळ चव्हाण याला राजापूर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच दिवसांच्या गौरी-गणपती विसर्जनानंतर ही घटना घडली.राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौंदळ-भालेकरवाडीत चंद्रकांत बापू चव्हाण व त्यांचे चुलतभाऊ दत्ताराम गोपाळ चव्हाण शेजारी-शेजारी राहतात. चंद्रकांत चव्हाण व त्यांची पत्नी गावी राहतात, तर चंद्रकांत यांचा मुलगा व सून लहान मुलासमवेत रत्नागिरीला असतात. गणपती उत्सवानिमित्त ते सर्व आपल्या सौंदळ गावी आले होते.दरम्यान, शासनाच्या इंदिरा आवास योजनेतून चव्हाण कुटुंबाला घर प्राप्त झाले होते. त्या घरावरून चंद्रकांत व दत्ताराम यांच्यामध्ये वरच्यावर खटके उडत होते. शिवाय अन्य सामाईक जमिनीवरूनही त्यांच्यात कायम संघर्ष होता. सोमवारी सायंकाळी सर्वत्र पाच दिवसांच्या गौरी-गणपतीच्या विसर्जनाची धामधूम सुरू होती. त्यानुसार चंद्रकांत व दत्ताराम यांच्या घरची मंडळी गणपतीच्या विसर्जनासाठी नदीकाठी गेली होती. या दरम्यान चंद्रकांत व दत्ताराम हे दोघेही घरीच होते. काही दिवस आजारामुळे चंद्रकांत हे घरीच असत. त्यांच्यासमवेत त्यांचा तीन वर्षांचा नातूदेखील होता. ाराम एका धारदार शस्त्रासह चंद्रकांत यांच्या घरात घुसला व त्याने चंद्रकांत यांच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. नेमके त्याचवेळी गणपती विसर्जन झाल्याने सर्व मंडळी घरी परतत होती. चंद्रकांत यांची सून साक्षी संदीप चव्हाण ही आपला लहान मुलगा घरी असल्याने सर्वांत प्रथम घरी पोहोचली. त्यावेळी आपल्या सासऱ्याला चुलत सासऱ्याकडून मारहाण होत असल्याचे पाहून ती हादरली. सर्वप्रथम तिने आपल्या मुलाला उचलले. सुदैवाने तो सुरक्षित होता. नंतर तिने घरातून बाहेर पळ काढला व घराकडे येत असलेल्या सर्वांना घरात चालू असलेल्या प्रकाराची माहिती दिली. ते ऐकून सर्वजण हादरून गेले. मात्र, त्यांच्यापैकी कुणीच घरी जाण्याचे धाडस दाखवले नाही.
दरम्यान, झाल्या प्रकाराची माहिती राजापूर पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक विकास गावडे, उपनिरीक्षक प्रकाश सुतार, उपनिरीक्षक ओठवणेकर हे आपल्या फौजफाट्यासह सौंदळ गावी दाखल झाले. त्यावेळी जबर जखमी झालेले चंद्रकांत चव्हाण हे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या पोटावर, दोन्ही बाजूच्या कुशीत, पाठीवर, कमरेवर वार करण्यात आले होते.
गणपती विसर्जनानंतर हा प्रकार सौंदळ-भालेकरवाडीत घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर डीवायएसपी मारुती जगताप यांनीही सौंदळ-भालेकरवाडीला भेट देऊन पोलिसांना सूचना केल्या. पोलीस निरीक्षक विकास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)