दडपणाखालील काँग्रेसची गुप्त व्यूहरचना

By admin | Published: October 13, 2015 11:04 PM2015-10-13T23:04:29+5:302015-10-13T23:29:16+5:30

नगरपंचायत निवडणूक : हमखास निवडून येणारी जागा हातून निसटली

Covert understanding of Congress under subdued | दडपणाखालील काँग्रेसची गुप्त व्यूहरचना

दडपणाखालील काँग्रेसची गुप्त व्यूहरचना

Next

प्रकाश काळे -- वैभववाडी  नगरपंचायतीच्या सत्तेसाठी काँग्रेसला १३ प्रभागांतून किमान ९ उमेदवार निवडून आणावे लागणार आहेत. त्यामुळे हमखास निवडून येणारी जागा हातातून निसटल्याने दडपणाखाली असलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून गुप्तपणे व्यूहरचना आखण्याचे काम सुरू आहे. परंतु, काँग्रेस पक्षात ‘धुरंधर’ पदाधिकारी असताना एका नामनिर्देशनपत्रावर सूचकाची स्वाक्षरी नसणे हे अनाकलनीय असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
काँग्रेसचे युवा नेते आमदार नीतेश राणे यांच्यादृष्टीने वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे नगरपंचायतीची घोषणा झाल्यापासून आमदार राणे यांनी वैभववाडीत लक्ष केंद्रित करून निवडणूकपूर्व प्राथमिक तयारी करून ठेवली होती. सद्य:स्थितीत एकट्या काँग्रेस इतके मातब्बर आणि धुरंधर राजकारणी उर्वरित सगळ्या पक्षांचे मिळून होत नाहीत. तरीही अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव प्रभागातील मयूरी नाना तांबे हिचे नामनिर्देशनपत्र सुचकाची स्वाक्षरी नसल्याने अवैध ठरते, हे सर्वसामान्यांनाही न पटणारे आहे.
एकीकडे शिवसेना आणि भाजप काँग्रेसच्या व पर्यायाने आमदार नीतेश राणे यांच्या पाडावासाठी कंबर कसत असताना काँग्रेसचे पदाधिकारी मात्र, बेफिकीर झाल्याचे मयूरी तांबेच्या नामनिर्देशनपत्रावरून दिसून येते. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत अनेक निवडणुका स्वत: लढविलेले, किंबहुना अशा अनेक निवडणुकांची नामनिर्देशनपत्र हाताखालून घालविलेले जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, माजी सभापती अरविंद रावराणे, दिगंबर पाटील, बाळा हरयाण, असे एकापेक्षा एक माहीर पदाधिकारी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र सूचकाच्या स्वाक्षरी शिवाय दाखल होऊ शकते. ही बाबच सर्वसामान्य नागरिकांना गंमतिशीर वाटते.
काँग्रेस पक्षातील तसेच आमदार राणे यांच्या सतत जवळ असणाऱ्या काही मंडळींनी बंडखोरी केली आहे. आमदार म्हणून ही निवडणूक नीतेश राणे यांना जेवढी महत्त्वाची आहे. तितकीच ती पक्षासाठी महत्त्वाची आहे. मात्र, अशा परिस्थितीत काँग्रेसच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एकतर ही निवडणूक गांभीर्याने घेतलेली नाही किंवा निवडणुकीतील विविध ‘मॅनेज’ फंड्यांपैकी एखादा फंडा कामी आला असावा का? अशी चर्चा मयूरी तांबे हिचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरल्यानंतर दबक्या आवाजात सुरू झाली आहे. नगरपंचायतीमुळे पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून वाभवे-वैभववाडी वगळण्यात आले आहे. त्यामुळेच कदाचित काँग्रेसचे पदाधिकारी ही निवडणूक सहज घेत असावेत, अशी शक्यता व्यक्त होत आहे. वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत नामनिर्देशनपत्र स्वत: भरता न येणारेही काही उमेदवार आहेत. ही वस्तुस्थिती असताना नाना तांबे यांच्यासारख्या ज्येष्ठ शिक्षकाच्या मुलीच्या नामनिर्देशनपत्रात त्रुटी राहणे आणि त्या त्रुटी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नजरेस न पडणे निश्चितच अनाकलनीय आहे. आॅनलाईन, आॅफलाईन नामनिर्देशनपत्रांच्या गोंधळात सर्वांचीच तारांबळ उडाली हेही खरेच! पण, २0-२५ वर्षांच्या निवडणुकांचा अभ्यास असलेल्या अर्धा डझनापेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांची फौज असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या नामनिर्देशनपत्रात चुका राहिल्या असतील तर त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आणि तितकाच गंभीर आहे.

एक जागेने अडचणीत वाढ
महायुतीप्रमाणे काँग्रेसनेही वाभवे गावठाण भागातील विकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देत उमेदवार देणे टाळले आहे. त्यामध्ये भाजपला म्हणजेच महायुतीला एका जागेची लॉटरी लागली आहे. त्यामुळे निर्विवाद बहुमतासाठी महायुतीला आठ, काँग्रेसला १३ पैकी ९ उमेदवार निवडून आणावे लागणार आहेत. भाजपला बिनविरोध मिळालेली जागा काँग्रेसला अडचणीत टाकू शकते. त्यातच संदेश पारकर यांनी बंडाचा झेंडा उचलल्याने ते येथे प्रचारात उतरल्यास काँग्रेसच्या अडचणीत भर पडण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Covert understanding of Congress under subdued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.