बिबट्याकडून गाईच्या वासराचा फडशा, गावात भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 05:03 PM2019-09-23T17:03:05+5:302019-09-23T17:04:09+5:30
भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील भरवस्तीतील गोठ्यात शिरून गाईच्या सहा महिन्यांच्या वासराचा फडशा पाडला. ही घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी वाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.
बांदा : भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील भरवस्तीतील गोठ्यात शिरून गाईच्या सहा महिन्यांच्या वासराचा फडशा पाडला. ही घटना रविवारी पहाटे घडली. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी वाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.
इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील शेतकरी अनंत यशवंत भिसे यांनी घरानजीकच्या गोठ्यात रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या हंबरण्याचा आवाज ऐकला. त्यांनी गोठ्यात येत पाहिले असता गाय व वासरू सुखरूप होती. मात्र, भिसे यांच्या पत्नी रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गाईचे दूध काढण्यासाठी गेल्या असता त्यांना वासरू दिसले नाही. त्यांना गोठ्यात रक्ताचे डाग दिसून आले.
त्यांनी याबाबतची माहिती आपल्या पतीला दिली. भिसे यांनी गोठ्याशेजारी पाहणी केली असता वासराचे काही अवयव दिसून आले. दबा धरून बसलेल्या बिबट्याने पहाटेच्या सुमारास वासराचा फडशा पाडल्याचा प्राथमिक अंदाज भिसे यांनी व्यक्त केला.
वनविभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. भिसे यांचे २ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. भरवस्तीपर्यंत बिबट्या येत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.