गावात गायी कमी झाल्या, मात्र डॉक्टर वाढले
By admin | Published: July 29, 2016 10:53 PM2016-07-29T22:53:02+5:302016-07-29T23:30:39+5:30
काडसिध्देश्वर महाराज : सावंतवाडीत गो विज्ञान कार्यशाळेचे उद्घाटन
सावंतवाडी : एकेकाळी कोकणात यायचे झाले तर प्रत्येक घराच्या आजूबाजूला गायी दिसत होत्या. पण आता कोकणात गायीच दिसेनाशा झाल्या असून, सगळीकडेच गायी कमी झाल्या आहेत. त्यामुळेच गावात डॉक्टरांची संख्या वाढली असून, गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक घटकात शारीरिक व्याधी दूर करण्याची ताकद आहे, असे मत प. पू. काडसिध्देश्वर स्वामी यांनी मांडले. सिंधुदुर्ग जिल्हा आॅरगॅनिक फार्मस् फेडरेशनच्यावतीने गो विज्ञान परिषद व औषध निर्माण तथा सेंद्रिय शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते.
यावेळी हैदराबाद येथील भारतीय विज्ञान शाखेचे माजी संचालक डॉ. रवी, कृषी विभागाचे सहसंचालक अशोक लोखंडे, उद्योजक आदिनाथ येरम, योगेश प्रभू, बाळासाहेब परूळेकर, अभिमन्यू लोंढे, दीपक पांडा, कृषी विभागाचे अधिकारी रवी फाटक आदी उपस्थित होते.
प्रथम गो विज्ञान परिषदेचे उद्घाटन प.पू. काडसिध्देश्वर महाराज यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते म्हणाले, सर्व गोष्टीवर संशोधन होेऊ शकते, पण शेतीवर संशोधन करण्यासाठी शेतमालच लागेल. देशात १२५ कोटी जनता असून, फक्त ८ कोटी शेतकरी आहेत. शेतकरी अन्नधान्य पिकवतो; पण तोच आता सर्व क्षेत्रात मागे पडत चालला आहे. शेतकरी सर्वांना साभाळतो, पण त्यांना सांभाळणारा कोण नाही. अशी अवस्था आता शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे तुम्ही मोठे व्हा, पण आपल्या मातीला विसरू नका. देशी गाय ही आपले जीवन असून, तिच्या प्रत्येक घटकापासून माणसाला ऊर्जा मिळत असते. पण ते तयार करण्याचे सामर्थ्य आपल्यात असले पाहिजे. उरूग्वेसारख्या एका देशाची ३३ लाख लोकसंख्या आहे. मात्र, तेथे १ कोटी २० लाख गायी आहेत. मात्र, आपल्याकडे आता गायी कमी होऊ लागल्याने गावात डॉक्टरांची संख्या वाढू लागली आहे. वेगवेगळे आजार निर्माण झाले आहेत. प्रत्येक आजारावर वेगवेगळा डॉक्टर करावा लागतो. त्यामुळे माणसाचे आयुष्यच डॉक्टराला वाहून घेतल्यासारखे झाले आहे, असे मतही त्यांनी यावेळी मांडले. गायीपासून कर्करोग, किडनीचे आजार, सर्दी-खोकला आदी आजार बरे होऊ शकतात. पण त्यासाठी आपण पुढाकार घेऊन आपल्या दरवाजाच्यासमोर देशी गाय उभी राहिली पाहिजे, असे काम सर्वांनी करा. गायीचा उपयोग करून घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर म्हणाले, आपण हिंदू संस्कृती हरवत चाललो असून, हे सर्व पाश्चात्य संस्कृतीचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. सेंद्रिय शेती करणारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती दिसू लागली असून, आपण वाईट गोष्टी मागे टाकल्या, तरच आपणास भविष्यात निरोगी आयुष्य जगता येणे शक्य आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत. त्याचा उपयोग प्रत्येकाने करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हवामान विभागाचे माजी संचालक डॉ. रवी म्हणाले, पूर्वी माणूस डोक्याने शेती करीत असे. आता विज्ञानाचा वापर करीत आहे. पण डोक्याची शेती हीच खरी शेती असून, आम्ही अनेकवेळा हवामान शास्त्र हे पाहण्यासाठी जुन्या काळातील संतांनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग करतो, असे ते म्हणाले.
यावेळी उद्योजक आदिनाथ येरम, बाळासाहेब परूळेकर आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिमन्यू लोंढे, आभार रणजीत सावंत यांनी मांडले. कार्यक्रमाला रामानंद शिरोडकर, कृषी अधिकारी काका परब, गोविंदजी कासेटवार, विष्णूू भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
देशात फक्त
८ कोटी शेतकरी
देशाची लोकसंख्या १२५ कोटी एवढी आहे. मात्र, यात शेतकरी फक्त ८ कोटी आहेत. ते पूर्ण देशाला अन्नधान्य पुरवठा करतात. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांची संख्या वाढली पाहिजे, यासाठी शहराकडे न जाता खेड्यात राहून शेतकरी बना, असे आवाहन प.पू. काडसिध्देश्वर स्वामी यांनी केले.