बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई करा; कणकवली पोलिस ठाण्यासमोर ठाकरे शिवसेनेचे धरणे आंदोलन
By सुधीर राणे | Published: October 19, 2023 03:57 PM2023-10-19T15:57:21+5:302023-10-19T15:58:02+5:30
कणकवली : तालुक्यातील नांदगाव तिठा येथे अनधिकृतपणे बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विक्री केली जात आहे. त्या विक्रेत्यावर पोलिसांनी कोणतीही ...
कणकवली: तालुक्यातील नांदगाव तिठा येथे अनधिकृतपणे बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विक्री केली जात आहे. त्या विक्रेत्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने गुरुवारी ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून कणकवलीपोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी 'बंद करा ,बंद करा अनधिकृत दारू विक्री बंद करा' अशा घोषणा देत पोलिस ठाण्याचा परिसर शिवसेना कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता.
दरम्यान ,पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांना' त्या ' दारू विक्रेत्यावर लवकरात लवकर कारवाई होईल. असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, माजी नगरसेवक कन्हैया पारकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नांदगाव तिठा येथे गोवा बनावटीची दारू विक्री उघडपणे केली जात आहे. कारवाईची मागणी करुनही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळेच सुरेंद्र गणपत वायंगणकर हे राजरोसपणे दारू विक्री करत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्याचा फक्त देखावा केला. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही असे निवेदन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख हनुमंत म्हसकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना दिले होते. त्यानुसार ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाप्रमुख संदेश पारकर व कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्याशी चर्चा करताना पोलिसांवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रश्नांच्या भडीमार केला. आम्हाला तुमच्या विरोधात आंदोलन करण्याची पुन्हा वेळ येऊ नये याकरिता संबंधितांवर कारवाई करा. तसेच कुणालाही पाठीशी घातले जाता नये. कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी संदेश पारकर व सतीश सावंत यांनी केली. दारू विक्री कायमस्वरूपी बंद न झाल्यास ६ नोव्हेंबर रोजी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून दिला.