पेंडूरच्या कामाचे प्रस्ताव तयार करा
By Admin | Published: March 27, 2015 10:18 PM2015-03-27T22:18:44+5:302015-03-28T00:07:18+5:30
विनायक राऊत : जलसंधारण, पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा
चौके : मालवण तालुक्यातील पेंडूर गावासाठी पाण्याचा महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या पेंडूर तलावाची तसेच ग्रामस्थांची अनेक वर्षे मागणी होत असलेल्या तलावाच्या बंधाऱ्याच्या दुरूस्तीसंदर्भात खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी दुपारी जलसंधारण विभाग, लघुपाटबंधारे विभाग या खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत पेंडूर ग्रामस्थांशी चर्चा करून तलावाची पाहणी केली. ग्रामस्थांच्या सूचनांनुसार लवकरात लवकर पेंडूर तलावाच्या बंधाऱ्याचे काम करण्यासाठीचे प्रस्ताव बनविण्याचे आदेश दिले.
यावेळी सर्वप्रथम पेंडूरचे माजी सरपंच बाबा राणे यांच्या हस्ते राऊत यांचे तिळंबादेवी मंदिरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पेंडूर तलाव आणि बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली. यावेळी पेंडूर सरपंच सुभान सावंत, नंदू नातू, मालवण तालुकाप्रमुख बबन शिंदे, पेंडूर शाखाप्रमुख रामू सावंत, ग्रामसेवक
ए. जे. जाधव, किरण आकेरकर, अनिल ढोलम, डॉ. सावंत, देवगड जिल्हा परिषद उपविभाग शाखा कार्यालय मालवणचे उपअभियंता व्ही. जी. वाळके, ओरोस लघुपाटबंधारे विभाग शाखा अभियंता अ. ना. हिर्लेकर, आंबडपाल लघुसिंचन जलसंधारण उपविभाग सहायक अभियंता सर्जेराव पाटील, लांजा उपविभागाचे उपअभियंता एस. ए. लोले, शाखा अभियंता व्ही. जी. रजपूत, मालवण जिल्हा परिषद लघुपाटबंधारेचे उपअभियंता आर. व्ही. बागडे, शाखा अभियंता एच. एस. पाडगावकर, आदी अधिकारी आणि पेंडूर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी पेंडूर तलाव आणि बंधाऱ्यासंदर्भात काही सूचना केल्या. त्यामध्ये तलावाच्या बंधाऱ्यातून होत असलेली पाण्याची गळती थांबविणे, बंधाऱ्याच्या कडेने सेफ्टी गार्ड बसविणे, तलावाचे गेट उघडण्यासाठी चेनपुली बसविणे, रबरसेट बसविणे, सांडव्याची साफसफाई करणे, गेटची उंची वाढविणे, या मुख्य बंधाऱ्यास पूरक अशा ‘कुसबाना’ बंधाऱ्याचे नूतनीकरण करणे, तलावाच्या मुख्य बंधाऱ्याला सध्या १३ गाळे असून, त्यांची संख्या कमी करून सहा गाळे बनविणे या मागण्या ग्रामस्थांनी खासदार राऊत आणि अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या. यावर राऊत यांनी ग्रामस्थांच्या या सर्व सूचना विचारात घेऊन बंधाऱ्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव बनविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
प्रमुख मागण्या
तलावाच्या बंधाऱ्यातून होत असलेली पाण्याची गळती थांबविणे, बंधाऱ्याच्या कडेने सेफ्टी गार्ड बसविणे, तलावाचे गेट उघडण्यासाठी चेनपुली बसविणे, रबरसेट बसविणे, सांडव्याची साफसफाई करणे, गेटची उंची वाढविणे, मुख्य बंधाऱ्यास पूरक अशा ‘कुसबाना’ बंधाऱ्याचे नूतनीकरण करणे, तलावाच्या मुख्य बंधाऱ्याच्या गाळ्यांची संख्या कमी करून सहा गाळे बनविणे.