दर्जेदार आरोग्य सुविधा निर्माण करणार : नीतेश राणे
By admin | Published: December 5, 2014 10:22 PM2014-12-05T22:22:55+5:302014-12-05T23:28:52+5:30
मी जिल्ह्याचा विधीमंडळातील प्रतिनिधी आहे. त्यामुळे माझ्यावर कोण्या एकाचा हक्क नाही. प्रत्येकपर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचा प्रयत्न करणार
वैभववाडी : रस्ते, वीज, पाणी यापेक्षा जिल्ह्यात दर्जेदार आरोग्य सुविधा निर्माण करून प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी येत्या पाच वर्षात प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी भुईबावडा येथे केले. मोफत नेत्रचिकित्सा, मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
श्री दत्तमंदिर वैश्यसमाज भुईबावडा, संतोष देवी फाऊंडेशन मुंबई व श्री कोलते बंधु गांगणवाडी मांगवली यांच्या सौजन्याने व श्री टेके नेत्रचिकित्सालयाच्या सहकार्याने भुईबावडा दत्तमंदिराच्या सभागृहात मोतिबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच्या उद्घाटन समारंभाला सिने नाट्य अभिनेते सुशांत शेलार, महिला बालविकास सभापती स्रेहलता चोरगे, पंचायत समिती सभापती वैशाली रावराणे, जिल्हा परिषद सदस्य धोंडुशेठ पवार, दिलीप रावराणे, संतोष देवी फाऊंडेशनचे नरेंद्र केडिया, मांगवलीचे सुपूत्र लक्ष्मण कोलते, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, मंगेश गुरव, बंड्या मांजरेकर, शुभांगी पवार, माजी सभापती अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, प्रभाकर साठे, सरपंच प्रतिभा मोरे आदी उपस्थित होते.
आमदार नीतेश राणे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत वैश्य समाज पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी राहिला. त्यामुळे या शिबिराच्या निमित्ताने वैश्यबांधवांचे आभार मानण्यासाठीच मी आलो आहे. केवळ डोळे असून उपयोग नाही तर डोळसपणा असावा लागतो. हा डोळसपणा केडिया, कोलते यांच्यामध्ये आहे. अशा लोकांचीच समाजाला खरी गरज आहे. सामाजिक प्रगतीमध्ये सरकार इतकाच संस्थांचा मोलाचा वाटा आहे, असे स्पष्ट करीत मी जिल्ह्याचा विधीमंडळातील प्रतिनिधी आहे. त्यामुळे माझ्यावर कोण्या एकाचा हक्क नाही. ही जबाबदारी ओळखूनच आपण प्रत्येक माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते म्हणाले, जिल्ह्याचे राजकारण आणि समाजकारण करताना नारायण राणेंचा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो.
त्यांनी कोणालाही समाज पाहून पदे दिली नाहीत तर कार्यकर्त्यांची क्षमता पाहून प्रत्येक समाजाला प्रतिनिधीत्व देऊन सर्व समाजांना न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांचा वारसा पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न करीन. त्याचबरोबर केवळ भाषणबाजी न करता जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत परिवर्तन घडवून आणण्याचा माझा प्रयत्न राहील.
दत्तमंदिर वैश्यसमाज भुईबावडा यांच्या स्मरणिकेचे प्रकाशन राणे व मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी स्रेहलता चोरगे, वैशाली रावराणे, नासीर काझी यांनी विचार व्यक्त केले. भालचंद्र साठे यांनी प्रास्ताविक
केले. (प्रतिनिधी)
पुतळा सुशोभिकरणासाठी लाखाची घोषणा
भुईबावडा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याची स्थिती पाहून आमदार राणे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच महाराजांच्या पुतळ््यासाठी पक्षातर्फे एक लाख रूपये देण्याची घोषणा राणे यांनी केली. तसेच या पैशातून पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची विनंती भुईबावडा ग्रामस्थांना केली.
भुईबावड्यात येऊन धन्य झालो : जुवेकर
सिने नाट्य अभिनेते संतोष जुवेकर म्हणाले, ज्येष्ठ अभिनेते अविनाश नारकर यांचे माझ्या वाटचालीत खूप मोठे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. भुईबावडा त्यांचेच गाव आहे. ते इथे आल्याचे मला समजले त्यामुळे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ सहकाऱ्याच्या गावात आरोग्य शिबिराला हजेरी लावण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी धन्य झालो, अशा शब्दात अविनाश नारकर यांच्याबद्दलची कृतज्ञता जुवेकर यांनी व्यक्त केली.