विश्वासार्हता घसरतेच आहे
By admin | Published: October 9, 2015 09:14 PM2015-10-09T21:14:49+5:302015-10-09T21:14:49+5:30
-- कोकण किनारा
ऐन पितृपक्षात शिमग्याची धूळवड उडणार आहे. याला कारण आहेत त्या रत्नागिरी आणि मंडणगडमधील निवडणुका. मंडणगडमध्ये नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीत पहिल्याच निवडणुका होत असल्याने तेथील निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. रत्नागिरी नगर परिषदेत चारच जागांसाठी निवडणूक होत असली तरी त्यात राजकीय गोंधळ खूपच असल्यामुळे या निवडणुकीलाही खूप महत्त्व आले आहे. एका अर्थाने या निवडणुकीत रत्नागिरीतील सर्वांचीच राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पण खरंच हे राजकारणी लोकांच्या विश्वासार्हतेला पात्र आहेत का? आपल्याला वाट्टेल तेव्हा पक्ष बदलणाऱ्यांची, त्यांना निवडून देणाऱ्या जनतेशी काही बांधिलकी आहे की नाही, असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत.
मंडणगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मागास राहिलेला तालुका. मुंबईला सर्वात जवळचा तालुका असूनही, सर्वच अर्थांनी एका बाजूला पडलेला तालुका. गेल्या दहा - पंधरा वर्षात मंडणगडची स्थिती खूपच सुधारली आहे. मात्र, अजूनही हा तालुका मुख्य प्रवाहात आल्यासारखा वाटत नाही. जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांच्या मुख्य शहरांमध्ये नगर परिषद किंवा नगरपंचायत कार्यरत आहे. पण केवळ मंडणगड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मंडणगडमध्येच नगरपंचायत नव्हती. आता तो मार्ग मोकळा झाला आहे. मंडणगडमध्येही नगरपंचायत अस्तित्त्वात येऊ लागली आहे. या नगरपंचायतीची पहिली निवडणूक १ नोव्हेंबरला होत आहे. त्यामुळे मंडणगडमध्ये राजकीयदृष्ट्या जोरदार धूम उडाली आहे. मंडणगड हा गेली काही वर्षे तसा शिवसेनेचा बालेकिल्लाच. पण अलिकडे आमदार संजय कदम यांनी राष्ट्रवादीला तेथे चांगली जागा तयार करून दिली आहे. काँग्रेसलाही येथे बरे वातावरण आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने भाजपलाही येथे आशा वाटत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि रिपाइंने महायुती केली आहे. अपेक्षेप्रमाणे शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. या निवडणुकीमुळे मंडणगडमध्ये गेल्या काही महिन्यात कामेही बऱ्यापैकी होऊ लागली आहेत. माजी खासदार नीलेश राणे, आमदार संजय कदम यांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले आहे. शिवसेनेतर्फे रामदास कदम यांनीही मंडणगडमध्ये सभा घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीला विविध रंग आले आहेत. पहिलीच निवडणूक असल्यामुळे इथे जे काही रंग आहेत, ते पक्षीयच आहेत. अजून तरी त्यात मिसळ आणि भेसळ झालेली नाही.
मंडणगडमध्ये सर्वच्या सर्व १७ जागांसाठी निवडणूक होत आहे, पहिल्यांदाच नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. पण तरीही अधिक महत्त्व आले आहे ते रत्नागिरीतील चार जागांच्या पोटनिवडणुकीला. याला कारण म्हणजे उमेश शेट्ये यांनी केलेले पक्षांतर. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करण्याचा विधानसभा निवडणुकीतील उदय सामंत यांचा पॅटर्न यावेळी नगर परिषद पोटनिवडणुकीत उमेश शेट्ये यांनी वापरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली गळचेपी होत आहे, हे लक्षात येताच उमेश शेट्ये यांनी शिवसेनेत उडी मारली होती. तेथे असताना त्यांचे आणि उदय सामंत यांचे फारसे सख्य नव्हते. त्या एकूणच राजकारणात आपल्याला फारसे स्थान मिळणार नाही, हे लक्षात घेत उमेश शेट्ये शिवसेनेत दाखल झाले होते. शिवसेनेत त्यांचे स्वागत जोरदार झाले. मात्र, तेथे त्यांना उपरेपणाचीच वागणूक मिळाली. त्यांना कोणतेही महत्त्वाचे पद मिळाले नाही. उमेश शेट्ये यांच्या दृष्टीने नगराध्यक्षपद हेच उद्दिष्ट होते. मात्र, शिवसेनेत ते साध्य झाले नाही. शिवसेनेत आपली गळचेपीच होत आहे, याची जाणीव त्यांना याआधीच झाली होती. मात्र, गतवर्षी विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी शिवसेनेत उडी मारल्यानंतर राष्ट्रवादीत आपल्याला पुन्हा चमकण्याची संधी मिळू शकते, हे शेट्ये यांनी जाणले आणि त्यांची पावले पुन्हा घड्याळ्याच्या दिशेने पडू लागली.
उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीची अवस्था काहीशी बिकट झाली होती. राष्ट्रवादीलाही खमक्या नेतृत्त्वाची गरज होती. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी उमेश शेट्ये यांचा असलेला स्नेह सर्वपरिचित आहे. सुनील तटकरे यांचे पालकमंत्रीपदाच्या काळात रत्नागिरीतील सर्वाधिक दौरे हे उमेश शेट्ये यांच्या कार्यक्रमासाठीच झाले आहेत. त्यामुळे शिवबंधन काढून हातावर घड्याळ बांधण्याचा उमेश शेट्ये यांचा प्रवास काहीसा सुखकरच झाला.
सद्यस्थितीत उमेश शेट्ये यांना पुन्हा प्रकाशात येण्यासाठी राष्ट्रवादीची आणि रत्नागिरीत गमावलेली पत मिळवण्यासाठी राष्ट्रवादीला उमेश शेट्ये यांची गरज आहे. त्यामुळे अखेर गंगेत घोडं न्हालं आणि उमेश शेट्ये यांनी शिवसेनेच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.
राजकारणी लोकांकडे विश्वासार्ह नजरेने पाहावं, अशी स्थिती आता राहिलेली नाही, असं वारंवार वाटतं. मंत्रीपद, पालकमंत्रीपद, प्रदेशाध्यक्षपद मिळूनही उदय सामंत राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले चार नगरसेवक शिवसेनेच्या वळचणीला गेले. शिवसेनेचे म्हणून निवडून आलेले उमेश शेट्ये आयत्यावेळी राजीनामा देऊन राष्ट्रवादीत गेले. हे सारे काही राजकारण समाजहितासाठी केले जात आहे का? आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्त्व करतो आहोत, त्या भागावर काही अन्याय होतोय, म्हणून ही पक्षांतरे झाली आहेत का? या प्रश्नांची उत्तरे आता सर्वसामान्य माणसांनीच शोधायची आहेत. या राजकारण्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. सध्याचे राजकारण हे केवळ स्वार्थासाठीचे सुरू आहे. आज अमुकची बायको राजकारणात आली, उद्या तमुकची सून राजकारणात आली. पक्षवाढीची कुठलीही कामे न करता, लोकांमध्ये कसलीच ओळखही नसताना थेट तिकिटे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणारी माणसं आपले लोकप्रतिनिधी होतात. त्यांना वाटतं, तेव्हा ते पक्षांतर करून मोकळे होतात. यात कशाचाच कशाला धरबंध राहिलेला नाही.
सर्वसामान्य लोक ‘आम्हा काय त्याचे’ अशा तटस्थ भूमिकेत असल्यानेच दलबदलू राजकीय लोकांचे फावते आहे. वेळ आली आहे ती मतदारांनी जागे होण्याची. ते जोपर्यंत जागे होत नाहीत, तोपर्यंत ही पक्षांतरे अशीच सुरू राहणार... आणि त्यातून साधला जाणार तो फक्त स्वार्थ!
मनोज मुळ््ये