‘विराट’च्या प्रशिक्षकांनी दिले विद्यार्थ्यांना क्रिकेटचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:51 PM2019-05-12T23:51:40+5:302019-05-12T23:51:51+5:30
कणकवली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी गुरुवारी कणकवली तालुक्यातील कलमठ येथील व्ही. ...
कणकवली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी गुरुवारी कणकवली तालुक्यातील कलमठ येथील व्ही. के. क्रिकेट अकादमीला भेट देत नवोदित क्रिकेटपटूंना क्रिकेटचे धडे दिले. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या क्रिकेट अकादमीचे राजकुमार शर्मा यांनी कौतुक केले.
मुंबई, पुणेमध्ये ज्या धर्तीवर क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जाते त्या धर्तीवर येथील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न व्ही. के. क्रिकेट अकादमीत आम्ही करीत आहोत. आगामी काळात याठिकाणी आणखी दर्जेदार क्रिकेटपटू व प्रशिक्षक आणून जिल्ह्यातील क्रिकेटपटू घडविले जातील, अशी ग्वाही आमदार नीतेश राणे यांनी यावेळी दिली.
कलमठ येथे विनोद कांबळी क्रिकेट अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना क्रिकेटचे धडे दिले जात असून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी गुरुवारी याठिकाणी उपस्थिती दर्शविली.
यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या स्वरुपा विखाळे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, महेश लाड, सुहास मालंडकर, व्यवस्थापक ऋषी भावे, प्रशिक्षक महाले, जितू कांबळी, मिलिंद चिंदरकर, शानू शेख, श्रद्धा कदम, सायली पवार आदी उपस्थित होते.
राजकुमार शर्मा यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच क्रिकेटमध्ये वापरात येणाऱ्या बारकाव्यांची त्यांना माहिती दिली. तसेच येथील विद्यार्थीदेखील मेहनती असून या विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेतल्यास यातूनच उद्याचे क्रिकेटपटू घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रशिक्षकांचेदेखील शर्मा यांनी कौतुक केले.
जगभरात अथवा वेगवेगळ्या राज्यात ज्या-ज्या नवनवीन गोष्टी दिसून येतात, त्या गोष्टी माझ्या मतदारसंघात आणण्याचा माझा प्रयत्न असल्याचे नीतेश राणे यांनी सांगून मुंबई, पुणेमध्ये ज्याप्रमाणे क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जाते, तसे प्रशिक्षण आपल्या मुलांना का मिळू नये? या जाणिवेतूनच आपण कलमठमध्ये विनोद कांबळी क्रिकेट अकादमीची स्थापना केल्याचे ते म्हणाले. राजकारणाच्या पुढे जाऊन तुम्ही भावी पिढीला कुठे घेऊन जाणार याचा प्रत्येक राजकारण्याने विचार करणे आवश्यक आहे. माझ्या जिल्ह्यातील मुले देशपातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रात असली पाहिजेत, हे माझे स्वप्न आहे. यासाठी आवश्यक प्रशिक्षण त्यांना दिले जाईल. त्यातीलच हा एक प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
गेले वर्षभर व्ही. के. क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून लहान मुलांना वेगळ्या दर्जाची प्रशिक्षणे दिली जात आहेत. रणजी क्रिकेटपटूंनी याठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून ज्यांनी विराट कोहलीसारख्या क्रिकेटपटूला घडविले त्या राजकुमार शर्मा यांनी आज याठिकाणी येऊन आमच्या मुलांना मार्गदर्शन केले आहे. भविष्यात क्रिकेट खेळताना या मार्गदर्शनाचा येथील विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होईल. आम्ही पाहिलेले समृद्ध जिल्ह्याचे स्वप्न या मुलांच्या माध्यमातून पूर्ण व्हावे यासाठी राणे कुटुंबाचे प्रयत्न असल्याचेही राणे म्हणाले. येत्या काही आठवड्यांमध्ये याठिकाणी आणखी काही नावाजलेले क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिसतील, असेही ते म्हणाले.
...तर सिंधुदुर्गातूनही विराट, सचिन घडतील
विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिल देव यांच्यासारखा दशकातून एक क्रिकेटपटू निर्माण होतो. मात्र, या सर्वांनी स्वत:ला घडविताना घेतलेली मेहनतदेखील दुर्लक्षून चालणार नाही. येथील विद्यार्थीदेखील भविष्यात विराट, सचिन बनू शकतात. मात्र, त्यासाठी त्यांनी अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे. त्याबरोबरच त्यांना चांगल्या दर्जाचे मार्गदर्शन मिळणेदेखील तेवढेच महत्त्वाचे असल्याचे सांगून या विद्यार्थ्यांना अधिकाधिक क्रिकेट सामने खेळण्याची संधी मिळाल्यास या विद्यार्थ्यांचे भविष्यदेखील उज्ज्वल असल्याचे राजकुमार शर्मा यांनी यावेळी सांगितले.