ओसरगाव टोल नाक्यावर आंदोलन करणे भोवले, संदेश पारकर यांच्यासह १४ जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 01:20 PM2022-11-28T13:20:12+5:302022-11-28T13:30:31+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी झाली पाहिजे अशी मागणी करत ओसरगाव येथील टोल नाक्यावर घोषणाबाजी
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी झाली पाहिजे अशी मागणी करत ओसरगाव येथील टोल नाक्यावर घोषणाबाजी करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, हर्षद गावडे, यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे यांनी तक्रार दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केला आहे. मात्र, असे असतानाही शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी झाली पाहिजे अशी मागणी करत शिवसेनेसह राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकारी ओसरगाव येथील टोलनाक्याच्या ठिकाणी दाखल झाले होते.
यावेळी शिवसेना झिंदाबादच्या जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या होत्या. त्यानुसार या प्रकरणी वृषाली बरगे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार संदेश पारकर, हर्षद गावडे, प्रथमेश सावंत, सुदाम तेली, प्रभाकर सावंत, रिमेश चव्हाण, उमेश लाड, अनंत पिळणकर, मंगेश बावकर, धनंजय हीर्लेकर , बाबू तावडे, पांडुरंग कारेकर, सचिन राणे, चंदू परब, संतोष सुतार यांच्यावर मनाई आदेश भंगप्रकरणी कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत