कणकवलीत शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 PM2021-03-20T16:11:58+5:302021-03-20T16:13:41+5:30
Police Kankavli Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलेला असताना कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी व आक्षेपार्ह घोषणा दिल्याबाबत नगरसेवक कन्हैया पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू यांच्यासह सात जणांवर व अन्य तीन ते चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केलेला असताना कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी व आक्षेपार्ह घोषणा दिल्याबाबत नगरसेवक कन्हैया पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू यांच्यासह सात जणांवर व अन्य तीन ते चार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत गुरुवारी भाजपाच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षकांना निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्याची तत्काळ दखल घेत शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झालेल्या मध्ये कन्हैया पारकर (कणकवली), गीतेश कडू ( आचिणें- वैभववाडी), ललित घाडीगावकर (वागदे), सचिन पवार ( कलमठ ), किरण वर्दम ( साकेडी ) , वैभव माळकर ( कणकवली ) , निसार शेख ( कलमठ) व अन्य तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
आमदार नितेश राणे यांच्या विरोधात १७ मार्च रोजी सकाळी घोषणाबाजी व फलकबाजी केल्याबद्दल या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कणकवली तालुका भाजपा शिष्टमंडळाच्यावतीने पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली आहे. नरडवे नाक्यासमोर १७ मार्च रोजी शिवसेना कार्यालयासमोर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी नीतेश राणे यांच्या विरोधात मनाई आदेशाचा भंग करत बेकायदा जमाव केला .
मनाई आदेशाचा जाणीवपूर्वक भंग
यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, ललित घाडीगावकर, निसार शेख, उमेश गुरव, प्रतीक रासम, सचिन पवार, किरण वर्दम अशा कार्यकर्त्यांनी नीतेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मनाई आदेशाचा शिवसेना कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक भंग झाला आहे.
तसेच त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तरी संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी भाजपा शिष्टमंडळातर्फे करण्यात आली होती. याबाबत पोलिसांनी पडताळणी करून गुन्हा दाखल केला. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.