गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
By admin | Published: December 19, 2014 09:56 PM2014-12-19T21:56:09+5:302014-12-19T23:29:49+5:30
हुमरस येथे झालेला युवतीचा खून तसेच देवगड येथील खून प्रकरण उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. यावर्षी बलात्काराचेही प्रमाण जिल्ह्यात वाढले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असले तरी त्या गुन्ह्यांचा उलगडाही त्याच प्रमाणात सुरू आहे. बंद बंगले तसेच शाळा फोडणारी टोळी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वावरत असल्याने या टोळीला आळा कसा घालायचा हा प्रश्न पोलिसांसमोर आहे. या टोळीतील काही जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी अद्याप टोळीच्या म्होरक्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.सावंतवाडीत आॅगस्टमध्ये घडलेल्या बहुचर्चित वासनाकांडाने अख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जप्त करण्यात आलेल्या बोलेरो गाड्या हाही चर्चेचा विषय ठरला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जुगार, मटका आणि अवैध दारू वाहतूक सुरू आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यात ना पोलीस विभागाला यश आले, ना उत्पादन शुल्क विभागाला. राजरोसपणे हे धंदे सुरू आहेत आणि तेही खाकीच्या आशीर्वादानेच.
हुमरस येथे झालेला युवतीचा खून तसेच देवगड येथील खून प्रकरण उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. यावर्षी बलात्काराचेही प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे.
जिल्ह्यात शाळा फोडणारी टोळी कार्यरत होती. त्या टोळीतील एका युवकाला आंबोली येथे पकडण्यात आल्यानंतर संपूर्ण टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. तसेच सावंतवाडीतील चराठा भागात बंद बंगले फोडणाऱ्या युवकालाही पोलिसांनी जेरबंद करून चोऱ्यांवर नियंत्रण मिळवले. लाचलुचपत विभागानेही चांगली कामगिरी केली असून अनेक लाचखोरांना रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळा तसेच बंद घरे फोडणारी टोळी कार्यरत होती. या टोळीला आंबोली पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे पकडण्यात यश आले. यामध्ये पाचजणांचा समावेश होता. तर मोबाईल शॉपी फोडणाऱ्या चोरट्यालाही पोलिसांनी पकडले.
एकाच कुटुंबातील पाच ठार
जिल्ह्यात यावर्षी अपघातांचे प्रमाण वाढले. झाराप-पत्रादेवी महामार्गावर छोट्या-मोठ्या गाड्यांचे अपघात झाले. यात गुजरात येथील कारला मळगाव येथे झालेला अपघात धक्कादायक होता. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जागीच मृत झाले. तर नांदगाव, आंबोली येथील अपघातही फारच धक्कादायक होते. अपघातांची वेगवेगळी कारणे आहेत. याशिवाय जिल्ह्यात आत्महत्यांचेही प्रमाण वाढले आहे. दोडामार्ग, सावंतवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. गोव्यातील दोन तरुणांनी सावंतवाडीत आत्महत्या केली होती.
अनंत जाधव