जिल्ह्यात तुलनेने गुन्ह्याचे प्रमाण कमी
By admin | Published: April 27, 2015 09:51 PM2015-04-27T21:51:18+5:302015-04-28T00:27:32+5:30
सर्वेक्षणातून मिळाली माहिती : ७७५ गुन्हे उघड, सर्वाधिक २७४ गुन्हे चोरीचे
गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्ह्याचे प्रमाण हे अतिशय कमी आहे, असे एका सर्व्हेवरून प्राप्त झालेल्या अहवालानंतर स्पष्ट होते. असे असले तरी गेल्या १६ महिन्यांत जिल्ह्यात घरफोडी, शाळा, ज्वेलर्स यासारख्या चोऱ्या, खून, विनयभंग, बलात्कार, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण यासारखे एकूण ९७७ गुन्हे घडले असून त्यापैकी ७७५ गुन्हे उघडकीस आणण्यास सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. यात सर्वाधिक २७४ गुन्हे चोरीचे घडले असून उघड मात्र १०९ गुन्हे झाले आहेत.सिंधुदुर्गच्या लोकसंख्येचा विचार केला तर राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लोकसंख्या खूप कमी आहे. सिंधुदुर्गची लोकसंख्या साडेआठ लाख एवढी आहे. त्यामुळे कमी लोकसंख्या असल्याकारणाने व साक्षर जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख असल्याकारणाने जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण हे तसे कमीच मानावे लागेल. राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्गातील गुन्ह्यांचे प्रमाण (रेषो) खूप कमी आहे असे राज्याच्या पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये उघड झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. असे असले तरी जिल्ह्यात चोऱ्या, खून, दरोडे, बलात्कार, विनयभंग यासारखे २० प्रकाचे गुन्हे घडले असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. ज्या प्रमाणात गुन्हे घडले आहेत तसे ते उघड करण्यातही पोलिसांना यश आले आहे.
महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. सिंधुदुर्गात हे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. असे असले तरी चोरी, विनयभंग यासारखे गुन्हे मात्र कमी होण्याचे नावच घेत नाहीत. समाजामध्ये नैतिकतेचा अभाव असल्यामुळे या अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. अन्याय, अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंता वाढविणाऱ्या ठरत आहेत. विशेषत: या अशा घटनांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ जिल्ह्याची शांतता तसेच सुव्यवस्थेला धोका निर्माण करत आहेत. जिल्ह्यातील चोरीच्या वाढत्या प्रमाणामुळे सिंधुदुर्गातील जनता हैराण झाली आहे. आता तरी या वाढत्या चोऱ्यांच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कणकवली शहरातील काही घरफोड्यांमध्ये रॉनी गँगच्या तीन संशयितांचा हात असल्याचे पोलीस तपासाअंती पुढे आले आहे. गुन्ह्यांमध्ये १८ ते २५ वयोगटातील तरुणांचा सहभाग वाढत असल्याने समाजव्यवस्थेलाही ही बाब धक्कादायक आहे. चोरी, मारामारी, विनयभंग, बलात्कार यासारखे गुन्हे ऐन तारुण्यात हातातून घडल्याने या प्रकारामुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. ज्या वयात करिअरच्या दृष्टिकोनातून पावले पडायला हवीत त्या वयात ही पावले तुरुंगाच्या वाटेवर पडताना दिसू लागली आहेत. तरुणांतून सामाजिक जबाबदारीचे भानच हरवत चालले आहे. या तरुणाईला योग्य दिशा मिळत नसल्याने ती गुन्हेगारीच्या विळख्यात आणखीनच गुरफटत चालली आहे. जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांचा पर्दाफाश होतो. त्यावेळी सर्रास गुन्हेगार हे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील असल्याचे तपासणीअंती उघड होत आहे. त्यामुळे या चोऱ्यांचे वाढते प्रमाण रोखणे पोलिसांसाठीच आव्हान ठरत आहे.
गुन्ह्याचे नावदाखलउघड
खून०९०९
खुनाचा प्रयत्न१०१०
सदोष मनुष्य वध०१०१
बलात्कार२१२१
दरोडा०५०५
जबरी चोरी१९१४
घरफोडी१००२१
चोरी१५५७४
दंगा४४४३
विश्वासघात१०१०
ठकबाजी३७३२
नाणीनोटा (खोट्या नोटा)०३००
घराविषयक आगळीक (दादागिरी)२८२८
अपक्रिया२०१४
दुखापत१३८१३७
सरकारी नोकरांना मारहाण३२३२
विनयभंग५५५५
आत्महत्येचा प्रयत्न१०१० अपघात९५८७
इतर१८२१५९
एकूण९७७७७५
जानेवारी २०१४ ते एप्रिल १५ अखेर ९९७ गुन्हे
१६ महिन्यांत ९९७ गुन्हे घडल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे. यात विविध सर्व गुन्ह्यांचा समावेश आहे.
त्यामानाने ते गुन्हे उघड करण्यासही पोलीस प्रशासनाला चांगले यश आले.
मात्र चोरी प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यात या विभागाला सपशेल अपयश आल्याचे दिसून येते.
जबरी चोरीचे १९ गुन्हे घडले. त्यापैकी १४ उघड झाले.
घरफोडीचे १०० गुन्हे घडले. त्यापैकी २१ उघड झाले व चोरीचे १५५ गुन्हे घडले त्यात ७४ गुन्हे उघड करण्यास पोलिसांना यश आले आहे.
असे एकूण चोरीचे २७४ गुन्हे घडले.
त्यापैकी नाममात्र १०९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
३२ सरकारी कर्मचाऱ्यांना झाली मारहाण
सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून वेळेत एखादे काम पूर्ण न झाल्याचा ठपका ठेवत काही राजकारणी व्यक्ती म्हणा किंवा काही सर्वसामान्य व्यक्तींकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केली जाते किंवा उपचारात हयगय केल्याचा ठपका ठेवून शासकीय डॉक्टरांनाही मारहाण केल्याच्या घटना सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या प्रकारचे तब्बल ३२ गुन्हे घडले असून ते सर्वच्या सर्व गुन्हे उघड झाले आहेत. या आकडेवारीवरून सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे अहवालावरून स्पष्ट होते.