तीन लाखांच्या अपहारप्रकरणी वरवडे पोस्टमास्तरवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:47 AM2019-04-15T11:47:55+5:302019-04-15T11:49:53+5:30
तालुक्यातील वरवडे ग्रामीण पोस्टातील बचत खात्यापैकी सुमारे ३५ खातेदारांचे, सुकन्या खात्यांमधील चार खातेदारांचे, आवर्ती खात्यातील १३ जणांचे आणि डी.डी. खात्यातील दोघांचे असे मिळून २ लाख ९२ हजार ४६४ रुपयांचा बनावट सह्या
कणकवली : तालुक्यातील वरवडे ग्रामीण पोस्टातील बचत खात्यापैकी सुमारे ३५ खातेदारांचे, सुकन्या खात्यांमधील चार खातेदारांचे, आवर्ती खात्यातील १३ जणांचे आणि डी.डी. खात्यातील दोघांचे असे मिळून २ लाख ९२ हजार ४६४ रुपयांचा बनावट सह्या करून अपहार केल्याप्रकरणी वरवडे पोस्टमास्तर भगवान तानाजी सादये ( रा. वरवडे) याच्याविरुद्ध कणकवली पोलिसांनी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार कणकवली उपविभाग डाकघराचे डाक निरीक्षक अमीर खान यांनी दिली.
हा गुन्हा ५ जून २०१५ ते २२ डिसेंबर २०१७ या कालावधीत घडला. १ जानेवारी २०१८ रोजी ज्यावेळी या पोस्टाचे लेखापरीक्षण झाले, त्यावेळी हा गुन्हा उघडकीस आला. याबाबतची तक्रार दाखल करण्यापूर्वी पोस्टखात्याने पोस्टमास्तर भगवान सादये याच्याकडून
त्याने केलेल्या अपहारप्रकरणी ३ लाख २९ हजार ८८५ एवढी रक्कम भरून घेतली. पोस्टामध्ये ग्राहकांसाठी विविध प्रकारची पैसे बचतीची खाती असतात. यामध्ये लोक विश्वासाने पैसे जमा करत असतात.
वरवडे पोस्टमास्तर भगवान सादये यांनी वरीलप्रमाणे विविध खात्यांवरची रक्कम खोट्या सह्या मारून परस्पर काढली. काही रक्कम खातेदारांनी खात्यामध्ये भरण्यासाठी दिली असताना त्यांच्या बचत खात्यांवर केवळ स्टॅम्प मारून दिला, परंतु ते पैसे पोस्टाकडे जमाच केले नाहीत. कणकवली उपविभाग डाकघरामार्फत ज्यावेळी या पोस्टाचे लेखापरिक्षण झाले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. लेखापरिक्षणानंतर हे पैसे पोस्ट खात्याने भरून घेतले आणि नंतर याबाबतची तक्रार कणकवली पोलिसात दाखल केली. याप्रकरणी पोस्टमास्तर भगवान सादये याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.