गुन्हेगार प्रवृत्तीला शिक्षा होतेच
By admin | Published: January 22, 2016 11:58 PM2016-01-22T23:58:19+5:302016-01-23T00:48:29+5:30
संतोष चव्हाण : साळेल येथे कायदेविषयक मार्गदर्शन
मालवण : कायदा हा सर्वश्रेष्ठ असतो. प्रत्येक पक्षकाराने हक्कांप्रमाणे कर्तव्याची जाणीव ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला कायदेविषयक ज्ञान असणे आवश्यक आहे. पक्षकाराचे नुकसान न होता त्यांना न्याय मिळावा हा उद्देश न्यायालयाचा असतो. गुन्हेगार व्यक्तींना शिक्षा करताना त्यांच्या ‘प्रवृत्ती’ला शिक्षा दिली जाते. तर निरापराध व्यक्तींना शिक्षा होऊ नये यासाठी न्यायालय सूक्ष्म तपास करून भूमिका बजावत असते, असे प्रतिपादन मालवण दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश संतोष चव्हाण यांनी साळेल येथे केले. साळेल येथे मालवण तालुका विधी सेवा समिती संघ यांच्यावतीने कायदेविषयक सहाय्य व सल्ला शिबिर प्राथमिक शाळा नं. २ सभागृह येथे आयोजित केले होते. यावेळी गटविकास अधिकारी राजेंद्र्र पराडकर, अॅड. हेमेंद्र्र गोवेकर, सरपंच साबाजी गावडे, माजी सरपंच कमलाकर गावडे, ग्रामसेवक सुशांत चौगले, पोलीस पाटील रवींद्र गावडे, दुलाजी चौकेकर, निवृत्त पोलीस निरीक्षक शिवाजी पोफळे, राम धनावडे, गणपत पडवळ, रोशन गावडे, उदय गावडे, भानजी गावडे, बाळा टेमकर, गणेश गावडे, संतोष गावडे, स्वाती गावडे, सर्वेश्वरी गावडे उपस्थित होते.
पराडकर यांनी शासकीय योजनांची माहिती देत सर्व योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले तर अॅड. गोवेकर यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करताना किरकोळ स्वरूपाचे वाद सामोपचाराने व तडजोडीने मिटविण्यात यावेत असे सांगितले. सूत्रसंचालन अॅड. गोवेकर तर आभार कमलाकर गावडे यांनी मानले. (प्रतिनिधी)
पोलिसांना दोष नको : चव्हाण यांचे आवाहन
चव्हाण म्हणाले, अलीकडील काळात शासकीय अधिकाऱ्यांना मारहाणीचे प्रमाण वाढत चालले आहे. यात पोलीस प्रशासन अप्रामाणिकपणे काम करत असल्याचे काही समाजघटकांकडून बोलले जात आहे. पोलीस स्थानकात अदखलपत्र गुन्हा दाखल झाला तर न्यायालयाच्या परवानगीशिवाय पोलीस तपास करू शकत नाही. यात पोलिसांना दोष दिला जात असतो. मात्र, पोलीस प्रशासन त्यांच्या कार्यपद्धतीनुसार योग्यरित्या काम करतात, असेही चव्हाण म्हणाले.