राजकीय दबावामुळे चोरटे मोकाट; बंगला फोडला, रोकड लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 09:03 PM2018-01-22T21:03:54+5:302018-01-22T21:04:16+5:30
शहरातील नावळे मार्गालगतचा बंगला दोन चोरट्यांनी फोडला. बंगल्यातील कपाटातून ५0 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली. बंगल्यातील सीसीटीव्ही फूटेजवरुन पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, राजकीय दबावामुळे तक्रार दाखल होवू न शकल्याने पोलिसांनी संशयितांना सोडून दिले.
वैभववाडी : शहरातील नावळे मार्गालगतचा बंगला दोन चोरट्यांनी फोडला. बंगल्यातील कपाटातून ५0 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली. बंगल्यातील सीसीटीव्ही फूटेजवरुन पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, राजकीय दबावामुळे तक्रार दाखल होवू न शकल्याने पोलिसांनी संशयितांना सोडून दिले. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांच्या भूमिकेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये तिरवडे तर्फ खारेपाटण येथील सुहासिनी सुभाष घुगरे यांचा नावळे मार्गालगत बंगला आहे. या बंगल्याच्या दर्शनी भागातील खिडकीची अॅल्युमिनियमची जाळी काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. शयनगृहातील पलंगाच्या कप्प्यातील कपडे व सामान विस्कटून टाकले. त्यामध्ये काहीच हाती न लागल्यामुळे चोरट्यांनी कपाट फोडून ५0 हजार हजार रुपये लंपास केले. हा सगळा प्रकार बंगल्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
कामगारांची मंजुरी देण्यासाठी ही रक्कम घुगरे यांनी कपाटात ठेवली होती. सकाळी हा प्रकार लक्षात येताच मुंबईस्थित घुगरे यांनी दूरध्वनीवरुन तिरवडे येथील शेजारी घुगरे यांना चोरीची कल्पना दिली. त्यामुळे घुगरे वैभववाडीत पोहोचले. तत्पूर्वीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी बंगल्यातील सीसीटीव्ही फूटेजवरुन दुपारी लागलीच संशयित तरुणांना ताब्यात घेतले. फूटेजवरुन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती शहरात पसरताच काही राजकीय व्यक्तींनी पोलीस ठाण्यात धाव घेत बंगल्याच्या मालकाशी संपर्क साधून प्रकरणाची मांडवली सुरु केली.
सीसीटीव्ही फूटेजवरुन पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतल्यामुळे त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार आणि हितचिंतकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. चोरीचे प्रकरण मिटविण्यासाठी राजकीय व्यक्तींचा दबाव वाढल्यामुळे कपाटातील ५0 हजार रुपये चोरीला गेले म्हणून सकाळी सांग-याने तक्रारदाराने सायंकाळी बंगल्यातून काहीच चोरीला गेले नसल्याचे सांगत चोरीबाबत तक्रार द्यायची नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे राजकीय व्यक्तींच्या साथीने सीसीटीव्हीत कैद झालेला गंभीर गुन्हा दडपण्यात वैभववाडी पोलीस यशस्वी झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
पोलीस अधीक्षक मेहरबान कशासाठी ?
वैभववाडी तालुक्यात गेल्या तीन महिन्यात विविध प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे घडले. त्यातील काही गुन्हे दाखलच होऊ शकले नाहीत. तर जे दाखल झाले त्या गुन्ह्यांची मांडवलीतून तीव्रता कमी करण्याचा कसोशीने प्रयत्न झाला. त्यामध्ये शहरातील या धाडसी चोरीची भर पडली आहे. सीसीटीव्ही कॅमे-याच्या फूटेजवरुन चोरट्यांना ताब्यात घेऊनसुद्धा राजकीय दबावामुळे चोरी दडपण्यात पोलीस यशस्वी झाले. पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम वैभववाडी पोलिसांवर एवढे मेहेरबान का? वैभववाडी पोलिसांवरील हा डाग ते पुसणार कसा? असा प्रश्न शहरात उपस्थित केला जाऊ लागला आहे.
पुरावे नसल्यामुळे सोडले : नितीन केराम
चोरीची घटना आणि न झालेल्या कारवाईबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम यांच्याशी संपर्क साधला असता, चोरीबाबत आमच्याकडे तक्रार दाखल झाली नाही. तसेच ताब्यात घेतलेल्या संशयिताविरुद्ध कोणताही पुरावा हाती लागलेला नाही. त्यामुळेच संशयिताला सोडावे लागले, असे केराम यांनी सांगितले.