गडहिंग्लजच्या नगराध्यक्षांवर फौजदारी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2015 09:43 PM2015-04-27T21:43:39+5:302015-04-28T00:47:20+5:30
हिरण्यकेशी प्रदूषणप्रश्न : नांगनूर येथील पाणी परिषदेत विजय देवणे यांचा इशारा
नूल : हिरण्यकेशी नदी प्रदूषित केल्याबद्दल गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा आणि नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असून, संकेश्वर कारखान्याचे अध्यक्ष रमेश कत्ती यांना शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी नांगनूर येथे दिला.
गडहिंग्लज शहराचे सांडपाणी आणि संकेश्वराच्या हिरण्यकेशी साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी हिरण्यकेशी नदीत सोडल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. या प्रश्नावर शिवसेनेतर्फे नांगनूर येथे आयोजित पाणी परिषद ते बोलत होते. पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, सुनील शिंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड म्हणाले, दोन्ही राज्यांचे सरकार महाराष्ट्र शासन व स्थानिक ग्रामस्थ अशा तीन टप्प्यांवर या प्रश्नावर लढा उभा करावा लागेल. याप्रश्नी कृती समिती नेमून हिरण्यकेशीची पाहणी करू. कायद्याच्या भाषेत कर्नाटक-महाराष्ट्र शासनाला प्रदूषण पटवून देण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय प्रदूषण मंडळाकडे तक्रार करणार आहे. गडहिंग्लजकरांच्या लढ्यात पर्यावरणवादी सक्रीय राहतील.
प्रा. सुनील शिंत्रे, दिलीप माने, अनिल चौगुले, सीमा मोकाशी, दीपा शिंदे, शिवाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. एल. एस. कोडोली यांनी प्रास्ताविक केले. निमंत्रक शाहू मोकाशी, अमोल नार्वेकर यांनी मेळाव्याचे आयोजन केले. मेळाव्यास श्रीरंग राजाराम, सागर तोडकर, सुरज हेब्बाळे, भरत जाधव, सरपंच सविता परीट, वसंत नाईक, किरण मोकाशी, प्रभाकर घोरपडे, रामचंद्र मोरबाळे, तानाजी नार्वेकर, विक्रांत नार्वेकर, अंजना रेडेकर उपस्थित होते. (वार्ताहर)
पाणी परिषदेची
पुढील दिशा
गुरूवारी (३० एप्रिल) नांगनूर, कडलगे, अरळगुंडीतील
ग्रामस्थ नांगनूर बंधाऱ्यावर गंगापूजन करणार.
रविवारी (३ मे) संबंधित गावे आणि तालुक्यातील शिवसेना महिला आघाडीला घेऊन गडहिंग्लज हिरण्यकेशी नदीपुलावर घागरींसह गंगापूजन. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, मुख्याधिकारी व पाणीपुरवठा समिती अध्यक्षांना समक्ष भेटून हा कार्यक्रम करणे.
रविवारी (१० मे) संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर हिटणी येथे सीमेवर छ. शिवाजी महाराजांचा पुतळ्यासह महा रास्ता रोकोसाठी ठाण मांडणे.