काजू बियांवर बुरशीजन्य रोगाचे संकट! बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 01:24 PM2022-02-28T13:24:47+5:302022-02-28T13:25:23+5:30
कोकणात मोठ्या प्रमाणात काजू, आंबा यांची लागवड केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हंगाम लांबल्यामुळे पालवी व पर्यायाने मोहोर येण्याच्या प्रक्रियेस विलंब झाला
रजनीकांत कदम
कुडाळ : सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी काजूवर काळे डाग दिसून येत आहेत. हे काळे डाग हे विशिष्ट प्रकारच्या बुरशीजन्य रोगामुळे असल्याची माहिती बागायतदार देत आहेत. या बुरशीमुळे काजू पिकांवर परिणाम होणार असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात काजू, आंबा यांची लागवड केली जाते. या फळबागायतीवर मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र वर्षातुन एकवेळ फळे लागणाऱ्या या आंबा, काजू झाडासांठी बागायतदारांना वर्षभर मेहनत करावी लागते. तरी येथील फळ लागण्याची प्रक्रीया येथील वातावरणावर अवलंबून असते. तसेच बऱ्याच रोगांच्या प्रादुर्भावालाही येथील झाडांना सामोरे जावे लागते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हंगाम लांबल्यामुळे पालवी व पर्यायाने मोहोर येण्याच्या प्रक्रियेस विलंब झाला. मोहोर फुटण्याच्या प्रारंभी डिसेंबर, जानेवारी महीन्यात पडलेल्या पावसामुळे मोहोरावर व छोट्या कणीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला.
कृषी विभागाने वर्तवली होती शक्यता
- तुडतुडे, फुलकिडी यांसह करपा, भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात आली होती. अशातच काही ठिकाणी काजुच्या पालवी व मोहोरावर ढेकण्या म्हणजेच टी मॉस्कीटो व पिवळसर रंगाच्या, अतिशय सूक्ष्म आकाराच्या फुलकिडीचा या दोन्हीहीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. यामुळे काजू पिकांना धोका निर्माण होऊन काजू उत्पादनावर परिणाम होणार आहे.
- अजूनही काही रोगांपासून काजू पिकांना धोका निर्माण होते. यावर येथील बागायतदार आपल्या परीने प्रयत्न करुन नियंत्रण करीत असतात. अशा संकटांना सामोरे जात असतानाच आता येथील काही काजू बियांवर सुरूवातीपासून काळे डाग मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. हा एक बुरशीजन्य रोगाचा प्रकार असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
फवारणी केली तरी बुरशी !
काजू पिकावर येणारे रोग टाळण्यासाठी आवश्यक त्या औषधांची फवारणी वेळोवेळी केली. सर्व प्रकारची काळजी घेतली. तरीपण काजू बियांवर सुरूवातीपासून काळे डाग येण्याच्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे जिल्ह्यातील काजू बागायतदारांनी सांगितले.
उपाययोजना करण्याची मागणी
बागायतदारांनी सर्व प्रकारची योग्य प्रकारे औषधांची फवारणी केली, योग्य प्रकारे काळजी घेतली, तरीपण येथील काजु बियांवर काळे डाग येणाचा बुरशीजन्य रोग कोणता आहे, त्यावर उपाय काय आहेत याबाबत काहीच माहिती अजुनही मिळाली नसुन यावर लवकरात लवकर उपाययोजना कृषी विभागाने न केल्यास त्याचा परिणाम निश्चितच काजु उत्पादनावर होणार आहे.