दुखण्यापेक्षा इलाजच ठरतोय गंभीर
By admin | Published: April 13, 2017 12:57 AM2017-04-13T00:57:01+5:302017-04-13T00:57:23+5:30
सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयात गैरसोयी : मुलभूत सुविधांची उपेक्षा; वीज, पाणी अपुरे; दुर्गंधीच्या विळख्यात शौचालय
रूपेश हिराप ल्ल सावंतवाडी
ऐन उन्हाळ्यात येथील उपजिल्हा रूग्णालयातील पंखे धूळ खात असल्याने आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी आलेल्या रूग्णांना घाम फुटत आहे. शिवाय रूग्णालयात पाण्याअभावी कोंडी होत असून कधीकधी हात धुण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनतो. शौचालयांची अवस्था तर फारच बिकट असून दुर्गंधीचा विळखा या विभागाला कायमच पडला आहे. परिणामी उपचारासाठी आलेल्या रूग्णांना दुखण्यापेक्षा इलाजच गंभीर ठरत आहे.
दरम्यान, निम्म्या जिल्ह्यातून दाखल होत असलेल्या रूग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असूनही रूग्णांच्या गैरसोयीकडे रूग्णालय प्रशासनाने सपशेल पाठ फिरविल्याने रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा असलेले हे रूग्णालय वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या समस्येने चर्चेत असते. रूग्णालयातील स्वच्छतेचा विषय, डॉक्टरांचा विषय तसेच अन्य विषयावरून या रूग्णालयात प्रश्न उपस्थित केले जातात. स्वच्छतेच्या बाबतीत वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले असता तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम करून अधिकारी नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात, ही वस्तुस्थिती आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असून, दररोज तापमानात वाढ होत आहे. यामुळे उकाड्याने अंगाची लाही लाही होत असताना उपजिल्हा रूग्णालयातील अर्ध्याहून अधिक सिलिंग पंखे नादुरूस्त असल्याने बंद अवस्थेत आहे. त्यामुळे रूग्णांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत रूग्णालयातील कर्मचारी अथवा अधिकारी यांचे रूग्णांच्या नातेवाईकांनी वेळोवेळी लक्ष वेधले असता त्यांच्याकडून वेगवेगळी उत्तरे दिली जात असल्याने रूग्णांसह नातेवार्इंकांतून संताप व्यक्त होत आहे.
शिवाय रूग्णालयातील बाथरूम, बेसीनमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, पाण्याअभावी रूग्णांची हेळसांड होत आहे. दरम्यान, वारंवार उद्भवला जाणारा शौचालयाचा प्रश्न यंदाही गंभीरच आहे. वास्तविक रोगराई पसरण्यास कारणीभूत असणारा हा विभाग असून येथे आवश्यक साफसफाई झालेली गेले वर्षभर पहावयास मिळालेली नाही. पाण्याअभावी ही गैरसोय होत असल्याने या विभागात अत्यावश्यक पाण्याची सोय करण्याची नितांत गरज आहे. साफसफाईच्या बाबतीत पाहिले असता स्वच्छतागृहामध्ये घाणीचे साम्राज्य आहे. बेसीनचे भांडे फुटलेले आहे. याबाबतीत काहीच दुरूस्ती केली जात नाही. बारा महिने दुर्गंधीने त्रस्त असणाऱ्या या विभागात जाताना रूग्णांसह नातेवाईकांना नाक धरूनच आत प्रवेश करावा लागतो, तरीही प्रशासनामार्फत याचे कसलेच गांभीर्य घेतले जात नाही.
सद्यस्थितीत रूग्णालयाची पाण्याची अशी कुठलीच व्यवस्था नसल्याने त्यांना नगरपालिका नळयोजनेचाच आधार आहे. पण ऐन उन्हाळ्यात पाण्याची कपात असल्याने आणि पुरेसे पाणी मिळत नसल्याने नळयोजनेचे पाणी रूग्णालयातील दररोजच्या वापरासाठी पुरत नाही. परिणामी रूग्णांना पाण्याअभावी हाल सहन करावे लागत आहेत.
रूग्णालय प्रशासनाला याबाबत विचारले असता पाण्याची तक्रार नाही, असे छातीठोकपणे सांगून वेळ मारून नेली जात आहे. पण ज्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना या विभागाचे काम करावे लागते त्यांना मात्र या समस्येला तोंड द्यावे लागते.
वैद्यकीय सेवेचा विचार केला तर वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णांना हवा तसा उपचार मिळत नाही. सद्यस्थितीत तीनच वैद्यकीय अधिकारी रूग्णालयात आहेत. मुळात अकरा वैद्यकीय अधिकाऱ्यांची मंजुरी या रूग्णालयाला मिळाली आहे. माकडतापाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रूग्ण तपासणीसाठी येत असताना त्यांना चांगली सेवा देताना अधिकाऱ्यांची कसरत होत आहे. त्यामुळे काहीवेळा लोकांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे.