खासदारांनी मच्छिमारांचीही केली दिशाभूल, परशुराम उपरकर यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 04:00 PM2019-03-19T16:00:06+5:302019-03-19T16:05:10+5:30
शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्तांना ते न्याय देऊ शकले नाहीत. खड्डेमय रस्त्यात आतापर्यंत २५० लोकांचा अपघाती मृत्यू व ५०० लोक जायबंदी झाले आहेत. त्याला जबाबदार सत्ताधारी, पालकमंत्री आणि खासदार असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केला.
कणकवली : मुंबई-गोवा चौपदरीकरणात असंख्य प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे खासदार विनायक राऊत यांनी दुर्लक्ष केले आहे. अनेकदा महामार्गाची पाहणी करीत बैठका घेतल्या. मात्र, शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्तांना ते न्याय देऊ शकले नाहीत. खड्डेमय रस्त्यात आतापर्यंत २५० लोकांचा अपघाती मृत्यू व ५०० लोक जायबंदी झाले आहेत. त्याला जबाबदार सत्ताधारी, पालकमंत्री आणि खासदार असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केला.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर उपस्थित होते. यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, लोकसभा निवडणूक आल्यानंतर खासदार विनायक राऊत पुन्हा आश्वासनांची खैरात करू लागले आहेत. गेल्या पाच वर्षांपूर्वी निवडणुकीत त्यांनी दिलेली आश्वासने केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना किती पूर्ण केली? त्याची विचारणा जनतेने केली पाहिजे.
मोबाईल मनोऱ्यांची भूमिपूजने करून विनायक राऊत यांनी श्रेय लाटले. पण खºया अर्थाने जिल्ह्यातील दूरसंचारची लॅण्डलाईन सेवा कोलमडली आहे. त्याला श्रेय लाटणारे राऊतच जबाबदार आहेत. एका बैठकीमध्ये दूरसंचारची सुविधा न सुधारल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा खासदारांनी दिला होता. हा इशारा जनतेची दिशाभूल करणारा ठरल्याचे परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आरोग्याच्या प्रश्नात जिल्ह्याची दयनीय अवस्था झालेली आहे. पर्ससीन आणि पारंपरिक मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. अनेकदा मच्छिमारांना आश्वासने देऊन खासदारांनी फसवणूक करण्याचे काम केले आहे.
सोनुर्लीतील महामार्ग ठेकेदाराच्या क्रशरवर हे खासदार गेले होते. त्यावेळी त्या क्रशरपासून होणारा त्रास नागरिकांनी दाखवून दिला होता.अवघ्या चार दिवसांत क्रशर बंद पाडू असे आश्वासन त्यावेळी त्यांनी स्थानिकांना दिले होते. तीही केवळ भूलथापच ठरली आहे, असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.