गांधींवर टीका करण्यापूर्वी त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घ्या
By Admin | Published: April 22, 2015 09:52 PM2015-04-22T21:52:41+5:302015-04-23T00:40:48+5:30
चंद्रकांत वानखेडे यांचे मत : कणकवली येथे व्याख्यान
कणकवली : देशातील जातिव्यवस्था आणि जातनिहाय कर्मव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. त्यांचे कार्य जाणून न घेता अनेकजण विनाकारण टीका करीत आहेत. मात्र, महात्मा गांधींवर टीका करणाऱ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे आधी तपासून पाहायला हवेत, असे मत ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांनी येथे व्यक्त केले.
शहरातील टेंबवाडी येथील म्हाळसाबाई भांडारकर हिंद छात्रालयात सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन केंद्राच्यावतीने सोमवारी ‘गांधी का मरत नाही?’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत वानखेडे बोलत होते. संशोधन केंद्राचे अंकुश कदम, प्रा. सोमनाथ कदम, आदी यावेळी उपस्थित होते.
चंद्रकांत वानखेडे म्हणाले, महात्मा गांधींना मारण्याचे सात वेळा प्रयत्न झाले. यातील पहिला प्रयत्न १९३५ मध्ये झाला होता. त्यावेळी तर देशाची फाळणी होण्याचा प्रश्नच नव्हता. गांधींचे विचार संपविण्यासाठी त्यांची बदनामी सुरू करण्यात आली आहे. गांधींनी सुभाषचंद्र बोस यांना आपल्याजवळ कधी घेतले नाही, अशी हाकाटी पिटली जात आहे. मात्र, सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात गांधींनीच पुढाकार घेतला होता. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील तुकड्यांची नावे गांधी, नेहरू, मौलाना आझाद, अशी होती. महात्मा गांधींनी मुस्लिमातील कडवेपणा कमी करून देश कार्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. तर हिंदूंमधील जातियता संपविण्यासाठी स्पृश्य व अस्पृश्य यांच्यात रोटी-बेटी व्यवहार सरू केले होते. त्यामुळे देशातील अभिजनवर्गाचे सर्वसामान्यांवर असलेले नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती. दुसरीकडे गांधी मुस्लिमांचा धर्म बदलतात, अशी हाकाटी मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांनी सुरू केली होती. त्यातून गांधींच्या बदनामीचा प्रयत्न सरू झाला होता. भारतावर मुस्लिम शासकांनी सुमारे ८५० वर्षे राज्य केले; परंतु या कालावधित हिंदू कधीही अल्पसंख्यांक झाला नाही. तर मग स्वातंत्र्यानंतर आताच तशी हाकाटी का पिटली जात आहे? त्याचा शोध प्रत्येक नागरिकांने घेणे आवश्यक आहे. हिंदू आणि हिंदुत्व एक असू शकत नाही. त्यामुळे सध्या देशाला हिंदुत्ववाद्यांचा अधिक धोका आहे. तो बळावल्यास देशाचे निश्चितपणे तुकडे होतील. महात्मा गांधी, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या खुनामागे संघटित राजकीय गुन्हेगारी आहे. गांधींच्या खुनाची जबाबदारी घेण्यात आली होती. मात्र, पानसरे तसेच दाभोळकर यांचे मारेकरी आणि त्यांना पोसणारी व्यवस्था पळपुटी निघाली आहे, अशी टीकाही वानखेडे यांनी केली. (वार्ताहर)
सुभाषचंद्र बोसाना काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात गांधींनीच पुढाकार घेतला होता. सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेतील तुकड्यांची नावे गांधी, नेहरू, मौलाना आझाद अशी होती. महात्मा गांधींनी मुस्लिमातील कडवेपणा कमी करून देश कार्यासाठी त्यांना प्रवृत्त केले.