बांद्यात मगरीची पिल्ले आढळली
By admin | Published: May 31, 2014 12:51 AM2014-05-31T00:51:42+5:302014-05-31T01:14:27+5:30
मगरींचा नदीच्या तीरावरील वावर वाढला
बांदा : तेरेखोल नदीपात्रातील मगरींची संख्या वाढत असून मगरींचा नदीच्या तीरावरील वावर वाढला आहे. काल सायंकाळी भलीमोठी मगर बांद्यात नदीच्या तीरावर आढळून आली होती. आज शुक्रवारी सकाळी बांद्यातील काही युवकांना मगरीची पिल्ले पाण्याबाहेर आलेली आढळली. नदीपात्रातील पाण्याची पातळी घटल्याने उथळ नदीपात्रातून ये -जा करणार्या लोकांसाठी तसेच पाळीव जनावरांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. गुरुवारी सायंकाळी नदीपात्रालगत भलीमोठी मगर विसावली होती. यावेळी मगरीला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मात्र, चाहूल लागल्याने या मगरीने नदीच्या पात्रात प्रवेश केला आणि शुक्रवारी सकाळी बांद्यातील युवक बाबलो धामापूरकर, राज हरमलकर, ऋषिकेश हरमलकर यांना याच परिसरात मगरीची सुमारे दहा ते पंधरा पिल्ले आढळली. त्यापैकी तीन पिल्ले पाण्याबाहेर नदी काठावर फिरत होती. या पिल्लांपासून कोणाला धोका होऊ नये, यासाठी या युवकांनी या पिल्लांना जाळीत पकडून वनखात्याच्या स्वाधीन केले. त्यानंतर या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. तेरेखोल नदीपात्रात मगरींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाळयात पुराच्या पाण्याबरोबरच मगरींची पिल्ले वाहत बांदा शहरात भरवस्तीत आल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, वनखाते मगरींचा बंदोबस्त करण्यास असमर्थ ठरत आहे. नदीपात्रात लोकांचा वावर असल्याने या मगरींपासून जीविताला धोका निर्माण झाला आहे. यासाठी वनखात्याने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)