तेरेखोल नदीपात्रात मगरींचा कळप

By admin | Published: January 18, 2015 11:07 PM2015-01-18T23:07:28+5:302015-01-19T00:24:17+5:30

यातील काही मगरी तर तब्बल १५ फुटांहून अधिक लांबीच्या आहेत. मगरींचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

Crocodile flock in Terekhol river bed | तेरेखोल नदीपात्रात मगरींचा कळप

तेरेखोल नदीपात्रात मगरींचा कळप

Next

बांदा : इन्सुली-तेरेखोल नदीपात्रात मगरींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज, रविवारी सायंकाळी धुरीवाडी येथील नदीपात्रात मगरींचा कळपच दृष्टीस पडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नदीपात्रातील मगरींची संख्या शेकडोंच्या घरात असून, नदीपात्रात उतरणेदेखील धोकादायक ठरू शकते.तेरेखोल नदीपात्रात गेल्या काही वर्षांमध्ये मगरींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. इन्सुली, बांदा, ओटवणे, विलवडे, शेर्ले येथे नदीपात्रात मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. मगरींकडून माणसांवर तसेच पाळीव जनावरांवर हल्ले होण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.इन्सुली- धुरीवाडी नदीपात्रात तब्बल ७० ते १०० मोठ्या मगरी आहेत. यातील काही मगरी तर तब्बल १५ फुटांहून अधिक लांबीच्या आहेत. मगरींचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात बागायती करण्यात येते. यासाठी नदीपात्रात शेतीपंप लावून पाण्याचा उपसा करण्यात येतो. दररोज या मगरी दृष्टीस पडत आहेत. आज सायंकाळी तब्बल २० ते २५ मगरी तेरेखोल नदीपात्राच्या मध्यभागी पहुडलेल्या होत्या. या नदीपात्रात शेतीपंपांबरोबरच गावांच्या नळपाणी योजनादेखील आहेत. यामुळे याठिकाणी शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन या नदीपात्रालगत वावरावे लागत आहे. मात्र, नदीपात्रात मगरींचा वावर वाढल्यानेनदीपात्रालगत शेती बागायती करणे शेतकऱ्यांच्या जिवावर बेतणारे ठरत आहे. या भागात मगरींकडून हल्ला होण्याचे प्रकारदेखील घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या नदीपात्रात मगरींच्या वास्तव्यामुळे शासनाच्यावतीने ‘मगर पार्क’ उभारण्याचा प्रयत्न होता. यासाठी महसूल विभागाकडून तत्कालीन सावंतवाडीचे तहसीलदार विकास पाटील यांनी सर्वेक्षणदेखील केले होते. मात्र, कालांतराने मगर पार्क संकल्पना बारगळली. (प्रतिनिधी)

Web Title: Crocodile flock in Terekhol river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.