Sindhudurg: सावंतवाडीतील मोती तलावात मगर
By अनंत खं.जाधव | Published: January 19, 2024 04:41 PM2024-01-19T16:41:15+5:302024-01-19T16:42:07+5:30
सावंतवाडी : येथील मोती तलावात शुक्रवारी मगरीचे दर्शन झाले. दरम्यान या मगरीची फोटो रवी जाधव यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. ...
सावंतवाडी : येथील मोती तलावात शुक्रवारी मगरीचे दर्शन झाले. दरम्यान या मगरीची फोटो रवी जाधव यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. आठवड्यापूवीही मगर पाण्याच्या पात्राबाहेर आली होती. पण तिची छबी टिपण्यात आली नव्हती. पण आज ही छबी टिपण्यात आल्याने मोती तलावात मगरीचे वास्तव्य असल्यावर शिक्कामोर्तब झाले.
मोती तलावातील जलपर्णी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जलपर्णीखाली पाण्यात पाण मांजराचे अस्तित्व होते पण सध्या ती ही दिसत नाही. त्यातच आता पुन्हा एकदा मगरीचे संकट उभे ठाकले आहे. मध्यंतरी तलावाच्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली पाणी आटवण्यात आले तेव्हा मगरीने आपला अधिवास सोडला होता. अशातच पुन्हा एकदा मगरीचे अस्तित्व दिसून आले.
ही मगर तीन फुटाची आहे. तलावात असलेल्या खडकावर ती आली होती. मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून भविष्यात कोणताही अनुचित प्रकार अथवा धोका निर्माण होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली.