सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'त्या' १८ केंद्रांवर अडकलेल्या पीक विमा रक्कमेचे वाटप सुरू

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 21, 2023 05:39 PM2023-11-21T17:39:46+5:302023-11-21T17:40:05+5:30

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५८ हवामान केंद्रे आहेत. त्यातील १८ केंद्रांवर वातावरणाचे रीडिंग होत नव्हते. त्यामुळे फळ पीक विम्याची ...

Crop insurance amount approved for 38 thousand 373 farmers of Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'त्या' १८ केंद्रांवर अडकलेल्या पीक विमा रक्कमेचे वाटप सुरू

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'त्या' १८ केंद्रांवर अडकलेल्या पीक विमा रक्कमेचे वाटप सुरू

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५८ हवामान केंद्रे आहेत. त्यातील १८ केंद्रांवर वातावरणाचे रीडिंग होत नव्हते. त्यामुळे फळ पीक विम्याची या केंद्रांवरील रक्कम अडकली होती. परंतु भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत आणि रिलायन्स इन्श्युरंस कंपनीचे राष्ट्रीय प्रमुख थॉमस आणि महाराष्ट्र प्रमुख पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ही रक्कम मिळवून घेतली आहे. त्यामुळे आता या १८ केंद्रांवरील विमा रक्कम वाटप सुरू झाले आहे. जिल्ह्यातील १७ हजार ५५६ हेक्टर क्षेत्रासाठी ६७ कोटी रुपये ३८ हजार ३७३ शेतकऱ्यांना ही रक्कम मंजूर झाली आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.

येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, कोकण विभाग संघटक डॉ भाई बांदकर, मालवण अध्यक्ष महेश सारंग, समर्थ राणे आदी उपस्थित होते. यावेळी सावंत यांनी फळ पीक विमा योजनेसाठी विरोधकांनी खूप प्रसिद्धी घेतली. परंतु प्रत्यक्षात ही रक्कम मिळण्यासाठी आपण १० ऑगस्ट २०२३ रोजी केंद्रीयमंत्री, पालकमंत्री, आयुक्त यांना पत्र दिले होते. तेथून हा विषय चाळवला गेला. मात्र, यासाठी खोलात जावून उमेश सावंत यांनी अभ्यास करीत कृषीचे वरिष्ठ अधिकारी आणि विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत आहे.

ते पुढे म्हणाले, पीक विमा रक्कम मिळावी, यासाठी भाजप पहिल्या पासून सकारात्मक होते. जिल्ह्यात सुरुवातीला ४० हवामान केंद्रे मंजूर होती. त्यात १८ केंद्रे वाढवून घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात ५८ केंद्रे झाली. विमा कंपनीने नुकसान देण्यास सुरुवात केली. त्यावेळी यातील ४० केंद्रांना ही रक्कम मंजूर झाली. कारण १८ केंद्रांवर रीडिंग होत नव्हते. त्यामुळे उमेश सावंत यांनी याचा बारकाईने अभ्यास करीत कृषी अधिकारी व विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत वारंवार बैठका घेत बंद असलेल्या केंद्रांच्या नजिक असलेल्या केंद्रांच्या आधारे ही रक्कम देण्यासाठी विमा कंपनीला भाग पाडले. परिणामी २० नोव्हेंबर पासून रखडलेल्या १८ केंद्रांवरील रक्कम देण्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठ दिवसांत ही रक्कम सर्व बाधितांना जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Crop insurance amount approved for 38 thousand 373 farmers of Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.