अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत; सिंधुदुर्गातील आंबा, काजू बागायतदारांची उडाली झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 05:50 PM2022-11-26T17:50:24+5:302022-11-26T18:27:47+5:30
अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत.
आरोस : हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा तिन्ही ऋतू सिंधुदुर्गवासीयांना काल, शुक्रवारी एका दिवसात पाहायला मिळाले. सकाळी पहाटेची थंडी, त्यानंतर कडक उन्ह आणि दुपारनंतर अवकाळी पावसाची मोठी सर कोसळली. अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत पडले आहेत.
बांदा दशक्रोशीला अवकाळी पावसाने अर्धा तास झोडपले. तसेच परिसरात गावातील काढणीयोग्य पिकलेले लाल झालेले नाचणी कणस व उडवी करून ठेवलेल्या भात पिकांचे व विलवडे येथील कनगी (कंदमुळे) चे नुकसान होण्याची शक्यता आहे.
सायंकाळी उशिरा पर्यंत पावसाची रिमझिम सुरु होती. यामुळे आंबा व काजूवर केलेल्या दोन फवारण्या वाया जाणार असल्याने बागायतदार चिंतातुर झाले आहेत. अवकाळी पाऊस असाच सुरु राहल्यास सर्व मेहनत वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
बांदा, पाडलोस, मडुरा, शेर्ले, रोणापाल, विलवडे, कास, इन्सुली, वाफोली,डेगवे परिसरात दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली. मळणीसाठी तयार करून ठेवलेली भाताची उडवी झाकण्यासाठी शेतकरी धडपडत होते.
तर आंबा व काजूवर सुरू असलेली फवारणी काही बागायतदारांना बंद करावी लागली. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या फवारणीचा खर्च पाण्यात गेल्याचे बागायतदारांनी सांगितले. मात्र या अवकाळी पावसाने बागायतदारांसह छोट्या शेतकऱ्यांचीही झोप उडवली. बांदा शहरात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी अचानक आलेल्या पावसामुळे दुकानांचा आसरा घेतला.
दरम्यान, शासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पिकांचे पंचनामे करावेत व कर्जदार आंबा व काजू बागायतदारांना अनुदान स्वरूपात दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात शुक्रवारी दमदार पाऊस झाला आहे. आक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस होताच आता नोव्हेबरमध्येही पाऊस पडत आहे.