आंगणेवाडी यात्रोत्सवात भाविकांची मांदियाळी, राजकीय नेत्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:55 PM2019-02-26T12:55:58+5:302019-02-26T13:02:52+5:30
मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या वाषिकोत्सवास सोमवारी पहाटे शानदार प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या भाविकांनी बोचऱ्या थंडीची तमा न बाळगता देवीचे भल्या पहाटे विविध दहा रांगातून दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ व प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे भाविकांना देवीचे दर्शन कमी कालावधीत घेता आले. सकाळच्या सत्रात भाविकांच्या गर्दीचा ओघ कमी वाटत असला तरी सायंकाळनंतर गर्दी वाढत गेली. त्यामुळे आंगणेवाडी गाव लाखो भाविकांच्या साक्षीने भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला.
सिद्धेश आचरेकर
मालवण : तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या वाषिकोत्सवास सोमवारी पहाटे शानदार प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनाची आस लागून राहिलेल्या भाविकांनी बोचऱ्या थंडीची तमा न बाळगता देवीचे भल्या पहाटे विविध दहा रांगातून दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ व प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे भाविकांना देवीचे दर्शन कमी कालावधीत घेता आले. सकाळच्या सत्रात भाविकांच्या गर्दीचा ओघ कमी वाटत असला तरी सायंकाळनंतर गर्दी वाढत गेली. त्यामुळे आंगणेवाडी गाव लाखो भाविकांच्या साक्षीने भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला.
दरम्यान, दीड दिवस चालणाऱ्या भराडी देवीच्या वाषिकोत्सवाची सांगता मंगळवारी मोड यात्रेने होणार आहे. दुसऱ्या दिवशीही हजारो भाविक देवीचरणी नतमस्तक होतात. त्यामुळे दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात व्यापाऱ्यांनी थाटलेल्या दुकानांतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. एस. टी. महामंडळाने मसुरे, मालवण, कणकवली या तिन्ही स्थानकांवरुन प्रवाशांना सुरळीत सेवा पुरविली. तसेच गावागावातून खास यात्रा स्पेशल गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते.आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ, आणि जिल्हा प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने झाले.
मालवण तालुक्यातील मसुरे-आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसर गजबजून गेला होता.
सकाळच्या सत्रात अनेक राजकीय, शैक्षणिक तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची भराडी देवीच्या दशर्नासाठी आंगणेवाडीत मांदियाळी फुलली. यात्रा भाविकांच्या गर्र्दीने गजबजून गेली होती.
केंद्रीय वाणिज्य व हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, उमा प्रभू, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, नीलम राणे, आमदार कालिदास कोळंबकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार विनायक राऊत, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार राजन विचारे, आमदार वैभव नाईक, माजी महापौर दत्ता दळवी, मनसे नेते बाळा नांदगावकर तसेच अनेक स्थानिक राजकीय नेत्यांनी देवीचे दर्शन घेतले.
भाविकांनी घेतले शिस्तबद्ध दर्शन
देवीची स्वयंभू पाषाणमूर्र्ती अलंकारांनी सजविण्यात आली होती. पाषाणाला मुखवटा घालून साडी-चोळी नेसवली तसेच भरजरी वस्त्रे, अलंकार, दागिने घालून देवीला सजविण्यात आले. देवीच्या दर्शनासाठी भाविक रांगेत उभे राहून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत होते. भाविकांच्या आदरतिथ्यासाठी आंगणे कुटुंबीय सज्ज होते.