मोडयात्रेलाही भाविकांची तुडुंब गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:45 AM2018-01-29T00:45:00+5:302018-01-29T00:45:24+5:30
मालवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी यात्रोत्सवाची रविवारी सायंकाळी उशिरा मोडयात्रेने उत्साहात सांगता झाली. भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला सलग सुट्यांमुळे भाविकांनी गर्दीचा उच्चांक मोडीत काढत विक्रमी गर्दी केली. शनिवारी सायंकाळनंतर उसळलेला भाविकांचा जनसागर रविवारी पहाटेपर्यंत कायम होता.
रविवारी सकाळच्या सत्रात गर्दी ओसरल्याचे चित्र असतानाच दुपारी १२ वाजल्यापासून भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. सायंकाळी चारनंतर मोडयात्रेला सुरुवात होऊन सायंकाळी उशिरा मोडयात्रेने कोकणच्या या महाउत्सवाची सांगता झाली.
आंगणेवाडी यात्रा ही दीड दिवसाची असते. पहिल्या दिवशी शनिवारी पहाटेपासूनच भाविकांसाठी नऊ रांगांतून दर्शन सुरू होते, तर रात्री नऊ वाजल्यापासून देवीला प्रसाद लावण्याचा सोहळा भाविकांनी नयनांत साठवून ठेवला. देवीच्या प्रसादाची ताटे सुहासिनी महिलांनी डोक्यावर घेत आणली. त्यानंतर ग्रामस्थांनी घरात बनविलेली प्रसादाची ताटे देवालयात आणण्यात आली.
यावेळी मंदिर परिसरात भाविकांची एकच गर्दी पाहावयास मिळाली. रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन बंद ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळपासून भाविकांच्या दर्शनाच्या रांगा भरलेल्या होत्या. मोडयात्रेच्या शेवटच्या टप्प्यातही हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
आंगणेवाडी यात्रोत्सव शेकडो दुकानांच्या साक्षीने उजळून गेला होता. मंदिर परिसरात करण्यात आलेली लक्षवेधक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. यावर्षीही लेसर किरणांचा वापर करण्यात आला होता.
लेसर किरण व ड्रोन प्रणाली लाखो भाविकांचे आकर्षण ठरले. गजबजलेली खाजा-मिठाईची दुकाने तसेच मनोरंजनात्मक प्रकारांना मोठा प्रतिसाद लाभला. तसेच शूटिंगबॉल स्पर्धेलाही क्रीडाप्रेमींचा
उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले. आंगणेवाडी
ग्रामस्थ मंडळाच्या पुढाकारातून व प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्यातून दीड दिवसाचा यात्रोत्सव शांततेत व सुरळीत पार पडला.
आंगणे कुटुंबाने घेतले दर्शन
भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी आंगणे कुटुंबीय नियोजनात व्यस्त असतात. त्यामुळे मोडयात्रेच्या दिवशी आंगणे कुटुंबीय मातेचे दर्शन घेतात; मात्र यावर्षी सलग सुट्ट्यांमुळे आंगणे कुटुंबीयांनी रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत कुटुंबीयांसह दर्शन घेतले नव्हते. सायंकाळी भाविकांची गर्दी ओसरल्यानंतर आंगणे कुटुंबीयांनी रांगेत उभे राहून भराडी देवीचे दर्शन घेतले. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस, महसूल, आरोग्य, वीज, आदी प्रशासकीय यंत्रणा तसेच आंगणे कुटुंबीय मुंबई मंडळ व स्थानिक मंडळ तसेच आंगणे परिवाराने परिश्रम घेतले.