पावसाळ्यासाठी बेगमीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी

By admin | Published: May 11, 2015 09:48 PM2015-05-11T21:48:56+5:302015-05-11T23:28:39+5:30

आगोटसाठी सज्ज : अवकाळी पावसाने वाढविली सर्वसामान्यांची लगबग; मोठ्या खरेदीमुळे दरात सवलत

Crowds for purchasing firearms for rainy season | पावसाळ्यासाठी बेगमीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी

पावसाळ्यासाठी बेगमीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी

Next

रत्नागिरी : पावसाळा सुरू होण्यास अजून महिनाभराचा अवकाश आहे. परंतु पावसाळ्यासाठी लागणारे बेगमीचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची दुकानातून गर्दी करताना दिसून येत आहे. आठवडा बाजारातून कांदे, बटाटे, लसूण, मसाल्याचे पदार्थ शिवाय सुक्या मासळीच्या खरेदीवर सर्वसामान्यांचा विशेष भर आहे. मोठ्या खरेदीमुळे किमतीतही सूट मिळत आहे.
अवकाळी पाऊस अधूनमधून हजेरी लावून जात असला तरी हवेतील वाढलेला उष्मा व सकाळच्या वेळेत दाटून येणारे आभाळ शिवाय पावसाळा ७ जूनपासून सुरू होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्याचा धसका घेत ग्राहकांनी तांदूळ, गहू, डाळी, कडधान्ये, तेल, साखर याची घाऊक स्वरूपात खरेदी सुरू केली आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने पावसाळ्यात शेतावर कामाला जावे लागते. त्यामुळे किराणा व अन्य साहित्यासाठी ग्रामीण भागातील मंडळींची गर्दी दिसून येत आहे. ग्रामीण भागातून आंबे, फणस, काजू विक्रीस येणाऱ्या महिलावर्ग शहरातून जाताना किराणा साहित्य खरेदी करताना दिसत आहेत.
गोडेतेल ६० ते ८८ रूपये लीटर, डालडा ८० ते ९० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने खवय्यांना सुक्या माशांचा आस्वाद घ्यावा लागतो. जवला (कोलीम) २४० ते २५० रुपये, बोंबील २०० ते २२० रुपये, काड २०० ते २३० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. शिवाय बारीक सुकट १५० ते १७० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. खारवलेली सुरमई, बांगडे यांनाही मागणी होत आहे. बल्याची सुकटे, शिवाय ढोमी माशांच्या सुकटांना विशेष मागणी होत आहे. १५० ते २०० रूपये शेकडा दराने सुकटांची विक्री सुरू आहे.
याशिवाय मसाल्याचे पदार्थ, प्लास्टिकच्या वस्तू, चप्पल यांचा खप वाढला आहे., लवंग ४०० रुपये, काळीमिरी ५५० रुपये, वेलची ११०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. पापड २०० ते ३०० रूपये किलो, तर पापड पीठ १८० ते २०० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. कोकणात पावसाळ््यापूर्वी बेगमी करण्याची प्रथा आहे. आगोट नावाने सुरू असलेली प्रथा पाळली जाते. यावेळीही त्यामुळे गर्दी आहे. (प्रतिनिधी)


मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर वर्षभरासाठी लागणारा मसाला घरोघरी केला जातो. दुकानातून विविध प्रकारचे मसाले विक्री उपलब्ध असले तरी तिखट शक्यतो घरीच तयार केले जाते. शिवाय पावसाळ्यासाठी लागणारे कडधान्य खरेदी करून ते वाळवून ठेवण्यात येते. कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर शक्यतो कीड न धरता टिकून राहाते. याशिवाय वाढत्या दरामुळे पावसाळ्यापूर्वी खरेदी सोयीस्कर ठरत आहे. बाजारातील पापड महाग पडत असल्याने पापड पीठ आणून घरात पापड करणेदेखील सोयीस्कर पडत आहे. सुट्यांमध्ये पापड, फेण्या वाळविण्याचे काम घरोघरी सुरू असलेले दिसून येत आहे. परीक्षांचा हंगाम संपून शाळांचे निकाल लागले आता खरेदीला गती आली आहे.

Web Title: Crowds for purchasing firearms for rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.