कणकवली बाजारपेठेत का होत आहे गर्दी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 12:16 PM2020-04-30T12:16:01+5:302020-04-30T12:19:49+5:30
कणकवली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असतानाही कणकवली शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दाखल होणारे अनेक नागरिक काळजी व उपाययोजना ...
कणकवली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असतानाही कणकवली शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दाखल होणारे अनेक नागरिक काळजी व उपाययोजना अमलात आणत नसल्याचे दिसून येत आहे. खरेदीसाठी मोठी गर्दी केली जात आहे. त्यामुळे पोलिसांना गर्दी पांगविण्यासाठी कारवाई करावी लागत आहे. पोलिसांनी शहरात गस्त घालायला सुरुवात केल्यावर बाजारपेठेतील गर्दी काहीशी कमी झाली.
कोरोना विषाणूचा धोका वाढत असताना आणि शासनाने निर्बंध घातले असताना नागरिक मात्र बेफिकीर राहून रस्त्यावर येत आहेत. भाजीपाला, किराणा व दुधासह जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना गर्दी करीत असल्याने कोरोनाचे संकट कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कणकवली शहरातील काही किराणा दुकानांसमोर खरेदीसाठी रांगा न लावता अनेक नागरिक गर्दी करीत असल्याचे पहायला मिळत आहे. पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने शहरात बाहेरील नागरिक दुचाकीवरून येत असून गर्दी करीत आहेत.
नागरिकांना आवर घालणे कठीण
शहरातील होलसेल दुकानात विशेषत: मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी शहरातील पूर्ण बाजारपेठ बंद होती. औषधांची दुकाने वगळता सर्व दुकानांसह भाजी विक्रीही बंद ठेवण्याचा निर्णय कणकवली व्यापारी संघ, नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या घेतला होता. त्यामुळे बुधवारी ही गर्दी उसळली होती. प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी उपाययोजना केली जात असताना नागरिकांना आवर घालणे कठीण झाले आहे. कणकवली शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असले तरीही छोट्या मोठ्या मार्गांनी नागरिक शहरात येत आहेत.