सागरी बंधाऱ्याची सीआरझेड परवाना प्रकरणे डावलली, शिवसैनिकांचे मुंबईत एम.सी.झेड.एम.ए.च्या कार्यालयासमोर आंदोलन
By सुधीर राणे | Published: December 8, 2022 06:06 PM2022-12-08T18:06:40+5:302022-12-08T18:07:08+5:30
पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
कणकवली: सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण येथे झालेल्या बैठकीच्या अजेंड्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः मालवण तालुक्यातील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची सीआरझेड परवानगीची प्रकरणे डावलण्यात आली आहेत. त्यामुळे काल, बुधवारी कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन केले.
यावेळी एम.सी.झेड.एम.ए.च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची सीआरझेड परवानगीची प्रकरणे पुढील बैठकीत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे वायरी, दांडी, सर्जेकोट, मसुरे खोत जुवा तळाशील, देवबाग, मेढा राजकोट, येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची प्रकरणे मंजूर झाली आहेत. मात्र, सीआरझेड परवानगीमुळे ही कामे थांबली आहेत. गेले काही महिने पाठपुरावा करून देखील कामांना मान्यता देण्यात आलेली नाही.
तसेच काल, बुधवारी झालेल्या बैठकीत देखील ती प्रकरणे अजेंड्यावर घेण्यात आलेली नाहीत. त्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पंढरी तावडे, संदेश कानडे, अनंत पाटकर, अमोल पाटकर, अक्षय देसाई, अजय रोहरा, विकास चिले आदी उपस्थित होते.