दोषींना तुरुंगाची हवा खावी लागेल
By admin | Published: August 16, 2016 11:17 PM2016-08-16T23:17:06+5:302016-08-16T23:31:37+5:30
दीपक केसरकर : महामार्गावरील खड्ड्यांबाबत अधिकारी, ठेकेदारांना इशारा
सिंधुदुर्गनगरी : ठेकेदारांना पक्ष नसतो. जे महामार्गावरील खड्ड्यांमध्ये दोषी असतील त्यांना जेलची हवा खावी लागेल. अधिकारी असो अथवा लोकप्रतिनिधी आतापर्यंत काहीजणांना शिक्षा झाली आहे. जे आज सुपात आहेत ते उद्या जात्यात असतील, असा इशारा गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी येथे दिला.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या सायबर लॅबचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पत्रकारांनी जिल्ह्यात महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असताना आतापर्यंत एकाही ठेकेदाराला काळ्या यादीत का टाकण्यात आले नाही? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी हे विधान केले.
यावेळी जिल्हाधिकारी
उदय चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, महाराष्ट्राचा गृहराज्यमंत्री झाल्यानंतर राज्यभरातील सर्व दारुअड्डे उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने आपण पाऊल टाकले आहे. किती गुन्हेगार पकडले? त्यापैकी किती गुन्हेगारांना शिक्षा होते हे महत्त्वाचे आहे. युतीच्या काळात शिक्षा होण्याचे प्रमाण ३५ टक्क्यांवर गेले आहे. हे प्रमाण पूर्वी १५ टक्के होते. पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. सिंधुदुर्गातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळविण्यासाठी स्वतंत्र हेड निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तालुकास्तरावर जागा उपलब्ध करून दिल्यास अत्याधुनिक घरे बांधून दिली जाणार आहेत.
एका विशिष्ट समाजाकडून देशात तसेच राज्यांमध्ये तरुणांना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे दहशतवादाला एकप्रकारे खतपाणी घालण्याचे काम समाजकंटकांकडून सुरू आहे. अशांवर पोलिसांनी लक्ष ठेवावे व सायबर लॅबचा वापर करावा, अशा सूचना त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिल्या.
तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी रीघ असते. याच धर्तीवर सागरेश्वर व उभादांडा येथील सागर किनारे व तेथील परिसर विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने या जिल्ह्याला पर्यटक पसंती देतात. त्यामुळे सिंधुदुर्गात पर्यटक मौजमजेसाठी येत असतात. असे असताना महामार्ग पोलिसांकडून पर्यटकांना त्रास देण्याचा नाहक प्रकार अद्यापही सुरू आहे. पर्यटकांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
लवकरच खड्डे बुजविणार
महामार्गावर पडलेले खड्डे सध्या पेव्हर ब्लॉकने बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गणेशोत्सवापूर्वी हे सर्व खड्डे बुजविण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना या खड्ड्यांचा त्रास होणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
‘सी-वर्ल्ड’चा प्रस्ताव सादर
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून सी वर्ल्डसाठी ४३० एकर जमिनीच्या भूसंपादनाचा एक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे.
सी वर्ल्डबाबत ग्रामस्थांच्या भावना निश्चितपणे विचारात घेतल्या जाणार आहेत. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आतापर्यंत सी वर्ल्डला किती जमीन लागेल, सर्व्हे नंबर किती हे निश्चित झाले नव्हते. ४३० एकर जमिनीवर हा प्रकल्प होणार आहे. सर्व्हे नंबर कोणते ते स्थानिक शेतकऱ्यांना दाखविण्यात येतील, असेही केसरकर म्हणाले.